शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी २ फेब्रुवारी रोजी रायगडमधील माणगाव येथे जाहीर सभा घेतली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक विधान केले होते. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शत्रू मानत नाही. पण ते मला शत्रू का मानतात. माझी चूक काय?”, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. ठाकरेंच्या या नव्या भूमिकेबाबत पत्रकारांनी राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी यावर मिश्किल भाष्य केले. मुनगंटीवार म्हणाले की, “आम्ही ही बाब सकारात्मकदृष्टीने घेतो. मात्र २४ ऑक्टोबर २०१९ चा विश्वासघातकी दिवस विसरलेलो नाहीत. त्यादिवशी दुपारी ४ वाजता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जी इच्छा व्यक्त केली होती, त्या इच्छेनंतरच पुढील सर्व प्रश्न उपस्थित झाले.”
सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल द्वेष नसल्याचे आता म्हणत आहेत, हे सकारात्मकदृष्टीने घ्यायला हवे. देशात राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. आपल्या देशात वाल्याचा वाल्मिकी होण्याची संधी दिली जाते. चूक केली असेल तर आयुष्यभर त्याच चुकीला पुन्हा पुन्हा उगाळले पाहीजे, असं नाही. उद्धव ठाकरे मोदींची प्रशंसा करत असतील, आदर व्यक्त करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे.”
गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामुळे महायुती तुटणार? भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
छगन भुजबळ यांनी राजीनामा दिला आहे का? या प्रश्नावर बोलत असताना मुनगंटीवार म्हणाले की, भुजबळांच्या राजीनाम्याचा कागद मी पाहिला नाही. त्यावर कुमी चर्चाही केली नाही. छगन भुजबळ यांनी भावनेच्या भरात राजीनामा दिला असल्याचे म्हटले आणि ते आता राजीनाम्याबाबत विसरूनही गेले. पण माध्यमांनी भुजबळांचा राजीनामा फार गंभीरतेने घेतला आहे. आता माध्यमांनीही याबद्दल विसरून जाणं, हेच राज्याच्या हिताचं आहे, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसानिमित्त कुख्यात गुंड येऊन भेटल्याचा फोटो आज संजय राऊत यांनी ट्विट केला होता. सरकारमधील नेते गुंडाची भेट घेत आहेत, त्यांच्याबरोबर फोटो काढत आहेत, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, मीदेखील अशाच एका घटनेला बळी पडलो होतो. आमदार म्हणून आम्हाला भेटायला अनेक लोक येतात. त्यात अनोळखी लोक येऊनही फोटो काढतात. त्या प्रत्येकाचे पोलीस व्हेरिफिकेशन करता येणे शक्य नाही. त्यामुळे फोटो काढला म्हणून आपण संबंधित व्यक्तीशी संबंधित आहोत, असा त्याचा अर्थ काढला जाऊ नये.
२४ ऑक्टोबर २०१९ रोजी काय झालं होतं?
२०१९ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल लागल्यानंतर ५०-५० टक्क्यांचा फॉर्म्युला मांडला होता. अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेत हा फॉर्म्युला ठरला होता, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. या पत्रकार परिषदेनंतर भाजपा आणि शिवसेना युतीमध्ये मीठाचा खडा पडला आणि शिवसेनेने एनडीएमधून बाहेर पडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केली होती.