सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत तीन मुलींनी वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील पोलिस प्रशासनावर कडाडून टीका होत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नुकतीच सोलापूर जिल्ह्याला भेट देऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतील. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी महिलांवरी अत्याचार रोखण्यासाठी राज्य महिला आयोग काय करत आहे, याची माहिती दिली. मात्र अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांपेक्षा पालकांनी अधिक सतर्क राहावे, असेही त्यांनी सांगितले. चार भिंतीच्या आत जर वडिलांकडूनच अत्याचार होत असतील तर पोलिस ते कसे रोखणार? असा सवाल चाकणकर यांनी उपस्थित केला.

हे वाचा >> सोलापूर : लागोपाठ तीन तरुणींच्या आत्महत्या; कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह असूनही महिला आयोगाच्या अध्यक्षांनी थोपटली पोलिसांची पाठ

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “मला छोट्या भगिनींना सांगायचे आहे की, शालेय जीवन जगत असताना आपण अभ्यासाचा, उज्ज्वल भविष्यावर लक्ष केंद्रीत केले पाहीजे. वयाच्या १४ वर्षी एका हातात मोबाइल आणि दुसऱ्या हातात टीव्हीचा रिमोट असल्यामुळे हल्लीच्या मुली आभासी जगात वावरत असतात. कुणी दोन शब्द चांगलं बोललं तर त्याला भुलणं आणि नको त्या भुलथापांना बळी पडण्याच्या गोष्टी घडत आहेत. आई-वडील आपले वैरी आहेत की काय? अशी भावना हल्लीच्या मुला-मुलींमध्ये प्रकर्षाने दिसते. पालक चुकीचे सांगतात असे मानून मुलं-मुली पालकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मुलं मोठी होत असताना पालकांनी संवादाची पद्धत बदलून मुलांना अधिक समजून घेतले पाहीजे.”

“मुलांना अपयश आले तरी त्यांना समजून घेतले पाहीजे. आत्महत्येचा निर्णय घेण्यापर्यंत मुलं कशी पोहोचतात? त्यांचे मन इतके कमकुवत का झाले? याचाही विचार पालकांनी करायला हवा. पोलिस किती ठिकाणी जाणार? काही ठिकाणी तर बापाकडूनच मुलींवर बलात्कार झाला आहे. मी स्वतः अशा नऊ प्रकरणांचा पाठपुरावा करत आहे. ज्याला बाप-लेकीच्या नात्याची विण माहीत नाही. ज्याला स्वतःच्या भावनांची समज नाही, त्यांचे सर्वांचे प्रबोधन करणे समाजाची जबाबदारी आहे”, असेही रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या.

हे वाचा >> ‘त्या’ महिलेने ३६ दिवस भोगल्या नरकयातना, तीन नराधम दररोज करायचे सामूहिक बलात्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याआधी महिला आयोग कुठेच दिसत नव्हता

पोलिस प्रशासनाकडून योग्य वेळी कारवाई होत नाही, असा नाराजीचा सूर पत्रकारांनी लावून धरल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोग कसे चांगले काम करत आहे. हे सांगण्याचा प्रयत्न केला. “राज्य महिला आयोग याआधी महाराष्ट्रात कुणालाही माहीत नव्हता. मी राज्यात फिरायला लागल्यानंतर महिला आयोगाची कामगिरी सर्वांना दिसत आहे. महिला अत्याचारापासून मानवी तस्करी रोखण्यापर्यंतची कामे आम्ही केली आहेत. पोलिस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्याचे त्यांचे काम करत आहे. पण ज्यावेळीस जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो, तेव्हा कायदा व सुव्यवस्था काय करणार? चार भिंतीच्या बाहेर कायदा सुरू होतो, चार भिंतीच्या आत होते त्याचे काय करणार?”, अशी पोलिसांची बाजू चाकणकर यांनी उचलून धरली.