अहिल्यानगर : ‘जलजीवन मिशन’ मधील पाणी योजनांच्या कामांचे, सर्वेक्षणापासून ते ठेकेदार नियुक्तीपर्यंतची कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेली आहेत. त्यांनी बसवलेल्या लोकांकडून कामे करून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली आहे. कर्जत-जामखेडमधील ठेकेदार आमदार रोहित पवार व पारनेरमधील ठेकेदार खासदार नीलेश लंके यांच्याशी लागेबांधे असलेले आहेत, असा थेट आरोप भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला आहे.

माजी खासदार सुजय विखे आज, मंगळवारी दुपारी अकोळनेर (ता. अहिल्यानगर) येथील कार्यक्रमास उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार व नीलेश लंके यांच्यावर पलटवार केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील जलजीवन मिशनमधील पाणी योजनांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) खासदार लंके यांनी संसदेत केली होती. तसे संबंधित मंत्र्यांना दिले होते. केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील काही कामांची चौकशीही केली. या पार्श्वभूमीवर सुजय विखे बोलत होते.

सुजय विखे म्हणाले, आरोप करणारे जर सायंकाळी ठेकेदाराला बोलून घेत असतील तर त्यातील वास्तविकता तपासली पाहिजे. जलजीवन मिशनमधील सर्व कामांचे सर्वेक्षण, त्याच्या निविदा, ठेकेदार नियुक्ती अशी सर्व कामे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली आहेत. कर्जत-जामखेडमध्ये सर्व ठेकेदार हे रोहित पवारांशी लागेबांधे असलेले आहेत. पारनेरमध्येही तत्कालीन आमदार लंके यांचे तेथे ठेकेदार आहेत.

मात्र, सरकार बदलल्यामुळे त्यांचे नुकसान झाल्याने, या सर्व गोष्टी उभारल्या जात आहेत. खरंतर कार्यारंभ आदेश निघाल्यानंतर सरकार बदलले. मात्र, त्यावेळी सरकारने बसवलेल्या लोकांकडूनच कामे करून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली आहे, अशी टीकाही सुजय विखे यांनी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मते वाद-विवाद सुरू आहेत. खैरे यांनी दानवे यांच्या विरोधात ‘मातोश्री’वर तक्रार केली आहे. यासंदर्भात बोलताना सुजय विखे म्हणाले, दोघांना ठाकरे यांच्या सेनेतून बाहेर पडून कुठेतरी जायचे असेल, म्हणून ते भांडण करत आहेत. ठाकरेंच्या सेनेतील नाराजी आता फॅशन झाली आहे. तक्रार करून उपयोग काय? कारण मातोश्रीवर ऐकायला तरी कोण आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता मातोश्री, संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीत एवढ्या वर्षानंतर बदल झालेला नाही. त्यामुळे मातोश्रीवर तक्रार करूनही काय होणार? त्यामुळे ज्यांना चांगल्या नेतृत्वाकडे जायचे असेल ते लोक प्रसारमाध्यमातून भांडण दाखवत आहेत आणि बाहेर पडणार आहेत, अशी टीकाही सुजय विखे यांनी केली.