रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत वादळ अखेर शमले आहे. माजी आमदार सुरेश लाड यांची नाराजी दूर करण्यात खासदार सुनील तटकरे यांना यश आले आहे. मात्र, जिल्हाध्यक्ष पदाचा लाड यांनी दिलेला राजीनामा पक्षाने स्विकारला आहे. लवकरच नव्या जिल्हाध्यक्षाची निवड केली जाईल, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. ते अलिबाग येथे पक्षाच्या जिल्हा कार्यकारीणी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी आमदार सुरेश लाड, कार्याध्यक्ष मधुकर पाटील, युवक अध्यक्ष अंकीत साखरे, महिला अध्यक्ष उमा मुंढे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

वरसोली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदीर सभागृहात पार पडलेल्या कार्यकारीणीच्या बैठकीनंतर लाड यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. लवकरच त्यांच्यावर पक्षाकडून विभागीय जाबाबदारी सोपविली जाईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. लाड कालही राष्ट्रवादीत होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत ते पक्षाचे पूर्णवेळ काम करतील असेही तटकरे यांनी यावेळी जाहीर केले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या रायगड जिल्हा दौऱ्या दरम्यान सुरेश लाड यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. कर्जत, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड मतदारसंघातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यांना ते गैरहजर राहिले होते. यानंतर ते भाजपात जाणार असल्याच्या चर्चा होत्या. अनेक दिवस ते संपर्कक्षेत्राच्या बाहेर होते. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी सुरेश लाड यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली.

यानंतर आज (३० एप्रिल) अलिबाग येथे पार पडलेल्या जिल्हा कार्यकारणी बैठकीला सुरेश लाड यांनी हजेरी लावली. आजारी असल्यामुळे संवाद मेळाव्यांना उपस्थित राहिलो नव्हतो. महामंडळ मिळावे यासाठी मी कधीही आग्रह धरला नव्हता. त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी यापुढे पार पाडीन, असेही लाड यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रावादी काँग्रेसमधील वादळ आता शमले असल्याचे यानिमित्याने दिसत आहे.

“कोंढाणे धरणाचे पाणी कर्जतला मिळावे”

कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणाचे काम सध्या सुरू आहे. हे धरण भाजपाच्या राजवटीत सिडकोला देण्याचा निर्णय झाला होता. धरणाचे पाणी महामुंबई क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात येणार होते. याला लाड यांनी आक्षेप घेतला आहे. धरणाचे पाणी हे कर्जतवासीयांसाठीच वापरले जावे. यासाठी धरण राज्याच्या जलसंपदा विभागाने ताब्यात घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा : “रायगड जिल्हा शरद पवार यांच्या आवडीचा जिल्हा, त्यामुळे…”, अदिती तटकरे यांचं जयंत पाटलांसमोर शब्द

आधीच मोरबे धरणामुळे कर्जतवासीयांवर अन्याय झाला आहे. धरण असूनही धरणाचे पाणी स्थानिक गावांना मिळत नाही. त्यामुळे कोंढाणे धरणाचे पाणी हे कर्जतसाठीच वापरले जावे, अशी मागणी लाड यांनी केली. दोन वर्षात यासंदर्भात निर्णय झाला नाही. त्यामुळे लाड नाराज होते, पण जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात लवकरच यासंदर्भात निर्णय होईल, अशी ग्वाही तटकरे यांनी यावेळी दिली.