अजिंठय़ातील काही लेणी हुबेहूब बनविता येतील? असे विचारण्याचे धाडस कोणी केल्यास त्याला वेडय़ात काढले जाईल. दुसऱ्या शतकापासून सातव्या शतकापर्यंत चित्र व शिल्पाच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या त्या अनाम कलाकारांचा वारसा सांगणारे कलाकार आजच्या काळात असतील तरी का, असा प्रश्नही विचारला जाईल. पण त्याचे उत्तर ‘हो’ असे आहे. अजिंठा लेणीच्या पायथ्याशी १३५ कलाकार अंजिठा लेणीची हुबेहूब प्रतिकृती बनविण्याच्या कामात व्यग्र आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळामार्फत अजिंठा पर्यटन केंद्रात चार लेणींची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. ‘सुपरस्टोन’ या कंपनीमार्फत उभारलेल्या या नव्या अजिंठा लेणीसह व्हीजिटर सेंटर १६ किंवा १७ सप्टेंबरपासून खुले होण्याची शक्यता आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री चिरंजिवी यांच्या हस्ते व्हीजिटर सेंटर सुरू होणार आहे.
भारतीय पर्यटक लेणी पाहावयास येतात, तेव्हा प्रत्येकाचा लेणींचा अभ्यास असतोच असे नाही. लेणी व शिल्पाच्या भव्यतेच्या पलीकडे पर्यटकांना माहिती देता यावी, या साठी पर्यटन विकास महामंडळाने वेरूळ आणि अजिंठा व्हीजिटर सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. अंजिठा येथील क्र. १, २, १६ व १७ या लेणींच्या प्रतिकृती बनविण्याचे ठरविण्यात आले. मूळचे अमरावतीचे राकेश राठोड, तसेच गुजरातच्या तेजल महादेवय्या यांनी गेल्या दीड वर्षांत ही चार लेणी उभारली. ती एवढी हुबेहूब आहेत की आपण अजिंठा लेणीच बघतो आहोत, असा आभास निर्माण होतो. प्रतिकृती तयार करताना एवढी काळजी घेतली आहे की, डोंगर माथ्यावर येणारा प्रकाश आणि जमिनीवर पडणारा उजेड याचा फरकदेखील जाणवत नाही. मूर्ती व लेणी उभारताना केलेले तांत्रिक प्रयोगही भारतात या निमित्ताने प्रथमच होत असल्याचा दावा या निर्माण कार्यात महत्त्वाचे योगदान असणारे सुपरस्टोनचे व्यवस्थापकीय संचालक राकेश राठोड करतात.प्रत्येक मूर्ती घडविण्याची एक वेगळी कहाणी आहे. प्रत्येक अडचणीवरचे उत्तरही नव्या पद्धतीने शोधले आहे. प्रतिकृती निर्माणासाठी सिमेंट व वाळूचे मिश्रण दुबईमधून मागविण्यात आले. किती सिमेंट वापरायचे आणि कोणती वाळू याचा संगणक प्रोगाम तयार केला गेला. पीपी ३ आणि पीपी ४ मिश्रणे वेळेवर उपलब्ध न झाल्याने काही दिवस कामही बंद ठेवावे लागले. पण दर्जा चांगला राहावा, या साठी पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी विशेष लक्ष देत होते. तयार केलेल्या प्रतिकृतीचे आयुष्य किमान दीडशे वष्रे टिकेल, असा दावा केला जात आहे. – सविस्तर लेख लोकरंगमध्ये
‘व्हीजिटर सेंटर’ कशासाठी?
बौद्ध तत्त्वज्ञान आणि जातक कथा आणि अजिंठा लेणींचे स्वरूप पर्यटकाला आधी कळावे आणि नंतर त्यांनी या ऐतिहासिक कलाकृती पाहाव्यात, असे व्हीजिटर सेंटरमध्ये अभिप्रेत आहे.
काय आहे व्हीजिटर सेंटरमध्ये?
या केंद्रामध्ये सहा हजार चौरस मीटरचा भाग लेणींची प्रतिकृती आणि प्रदर्शनीय आहे. यात तीन उपाहारगृहे असून एक विद्यार्थ्यांसाठी, तर एकाचे कामकाज ‘कॅफेटेरिया’ पद्धतीचे असेल. किमान २८० कार, २० बस व २०० दुचाकींसाठी प्रशस्त वाहनतळही येथे उभारले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2013 रोजी प्रकाशित
अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी प्रति‘अजिंठा’!
अजिंठय़ातील काही लेणी हुबेहूब बनविता येतील? असे विचारण्याचे धाडस कोणी केल्यास त्याला वेडय़ात काढले जाईल.
First published on: 27-08-2013 at 05:49 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Superston company built new ajanta cave