कराड : लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत २६ लाख महिलांना वगळण्यात आले असून, तब्बल ४ हजार ९०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. मात्र, याबाबत सरकार गप्प का, ही खंत असल्याची त्या म्हणाल्या.
खासदार सुळे कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कराडमधील माजी उपपंतप्रधान (कै.) यशवंतराव चव्हाण यांचे निवासस्थान विरंगुळा, वेणूताई चव्हाण स्मारक येथे भेट देऊन त्याची पाहणी केली. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. दरम्यान, वेणूताई चव्हाण न्यासामध्ये पत्रकारांशी खासदार सुळे यांनी संवाद साधला. माजी खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माहिती तंत्रज्ञान शाखेचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, माजी नगराध्यक्ष ॲड. विद्याताई साळुंखे आदींची उपस्थिती होती.
खासदार सुळे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेचे पैसे पुरुषांनी काढले आहेत. मात्र कोणत्या पुरुषांनी, त्यावर पुढे काय कार्यवाही झाली, याची माहिती सरकारकडे उपलब्ध नाही. ज्या महिलांची नावे योजनेतून वगळली गेली, त्या आधी योजनेत समाविष्ट कशा प्रकारे केल्या होत्या, तेव्हा कोणते निकष वापरले गेले, आत्ताच्या निकषांसह सरकार त्यांचा लाभ का रोखत आहे, हे सर्व प्रश्नांची सरकारला बंधनकारकपणे उत्तरे द्यावी लागतील. हे सारे सरकारचेच पैसे आहेत, मात्र त्याबाबत सरकार उत्तर देत नाही, हेच दुर्देवाचे असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले.
राहुल गांधींच्या ‘वोट चोरी’च्या आरोपांवर सुळे म्हणाल्या, ‘ही देशातील पहिली तक्रार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली होती. राहुल गांधी जे पत्र दाखवत आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या तक्रारीचे आहे. त्यामुळे हा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत. राज्य सरकारची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थिती सध्या अस्थिर आहे, अशा काळात विरोधक म्हणून आमची कणखर भूमिका नेहमीच राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
आरक्षणाबाबत सुळे म्हणाल्या, मराठा, धनगर, मुस्लिम व लिंगायत समाजासह सर्व समाजाला न्याय मिळावा, हीच मागणी आहे. आरक्षणाच्या बाजूने संसदेत सर्वांत जास्त वेळा मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. माझ्या मागण्यांचा डेटा उपलब्ध आहे, कोणीही तो तपासू शकतो. देशभरातील सर्व समाजाच्या मागण्या एकत्र करून व्यापक विधेयक तयार करावे व त्यावर सविस्तर चर्चा करून निर्णय घ्यावा, ही माझी संसदेतील स्पष्ट भूमिका असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.