Supriya Sule : महाराष्ट्रातल्या बीड या ठिकाणी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर मस्साजोग हे गाव आणि देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान आज या प्रकरणावरुन, वाल्मिक कराडच्या मकोकावरुन सुप्रिया सुळेंनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढंच नाही तर त्यांनी या खंडणीच्या प्रकरणात अजूनही ईडीचा सहभाग का नाही? असा प्रश्नही सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

सुप्रिया सुळेंचे प्रश्न काय?

१) वाल्मिक कराडची जी बँक खाती गोठवण्यात आली आहेत ती किती खाती आहेत आणि त्यात किती पैसे आहेत?

२) जर खंडणीचा गुन्हा दाखल असेल तर यामध्ये ईडीचा सहभाग का नाही? नवाब मलिक, संजय राऊत यांच्यावर खंडणीचे आरोप झाले तर ईडी लावली गेली. आता वाल्मिक कराडांच्या मागे ईडीचा ससेमिरा का नाही?

३) विष्णू चाटे जे कुणी आहेत त्यांचा फोन हरवला आहे असं सांगितलं जातं आहे. असा कसा काय मोबाईल हरवला? त्याचा सीडीआर कुठे आहे?

४) ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यापैकी एकावर खुनाचा आरोप आहे तो आरोपी अजूनही फरार कसा काय? खून केलेला माणूस पोलिसांना सापडत कसा नाही?

५) वाल्मिक कराडचं व्हॉईस सॅम्पलिंग घेण्यात आलं होतं त्याचं काय झालं?

७) परळीमध्ये मंगळवारी हिंसाचार झाला तो नेमका कसा झाला? तसंच देशमुख कुटुंबाने आधीच सांगितलं होतं की आम्ही टाकीवर चढून आंदोलन करणार, तिथे पोलीस हजर होते, त्यांनी देशमुख कुटुंबाला टाकीवर चढू कसं काय दिलं?

८) परभणी आणि बीड या दोन्ही ठिकाणी ज्या घटना घडल्या त्यातील कुटुंबांची जबाबदारी कोण घेणार?

९) सोमनाथ सूर्यवंशींच्या प्रकरणाचं पुढे काय झालं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा आपला महाराष्ट्र आहे का?

उशिरा का होईना वाल्मिक कराडच्या विरोधात मकोका लावला गेला आम्ही अभिनंदन करतो. पण पुढे काय? आम्हाला न्याय अपेक्षित आहे कारण एका मुलाचा खून झाला आहे. खंडणी वसुली होत असेल तर राज्यात गुंतवणूक कशी येणार? गुंतवणूकदार दहावेळा विचार करतील गुंतवणुकीच्या आधी. बीड आणि परळीमध्ये पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असती तर किती बरं झालं असतं. संतोष देशमुख यांची मुलगी दहावीत आहे, तिचं खेळण्याचं वय आहे पण दिवंगत वडिलांसाठी न्याय मागते आहे. हा आपला महाराष्ट्र आहे का? वेदना देणारी आणि अस्वस्थ करणारी बीडची ही घटना आहे. जे कुणीही यामध्ये थेट किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी असणाऱ्यांना फाशी झाली पाहिजे अशीही मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.