सोलापूर शहर (मध्य) मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभेच्या मविआच्या उमेदवारीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. प्रणिती शिंदे या यंदा सोलापूरमधून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगतेय. या चर्चेवर प्रणिती शिंदे म्हणाल्या, “सोलापूरमधून मी लोकसभा लढवणार आहे. माझ्या उमेदवारीची घोषणा ही केवळ औपचारिकता आहे. काही दिवसांत माझी उमेदवारी जाहीर होईल.” दरम्यान, या मतदारसंघात महायुतीने अद्याप कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही. महायुतीत ही जागा भाजपाकडे आहे.

भाजपाने नुकतीच महाराष्ट्रातील लोकसभेच्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीत सोलापूरचा समावेश केलेला नाही. भाजपाचे जयसिद्धेश्वर स्वामी हे सोलापूरचे विद्यमान खासदार आहेत. परंतु, भाजपा यंदा स्वामी यांचं तिकीट कापून भाजपा नेते राम सातपुते यांना उमेदवारी देऊ शकते. मतदारसंघात सध्या सातपुतेंच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्याचबरोबर भाजपा नेते आणि सोलापूरचे माजी खासदार शरद बनसोडेदेखील उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. २०१९ ला भाजपाने बनसोडे यांचं तिकीट कापून जयसिद्धेश्वर स्वामी यांना तिकीट दिलं होतं. भाजपाकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याने भाजपा नेते काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना आपल्या पक्षात घेण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या अलीकडेच पाहायला मिळाल्या होत्या. या बातम्यांवर प्रणिती शिंदे यांचे वडील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. शिंदे म्हणाले, भाजपाचा शेवटपर्यंत प्रणिती शिंदे यांना फोडण्याचा प्रयत्न होता, परंतु, प्रणिती तिच्या विचारांशी, काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक असल्याने तिने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला नाही.

हे ही वाचा >> वंचितच्या मविआ प्रवेशाआधीच वाद, प्रणिती शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून वंचितचा संताप; म्हणाले, “तुमच्यासारखे लोक…”

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, प्रणिती तिच्या विचारांशी प्रामाणिक राहिली आहे. भाजपा तिला आपल्या पक्षात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे. सोलापूरच्या जागेसाठी ते प्रयत्न करत आहेत. प्रणितीला आपल्या पक्षात घेण्यासाठी त्यांनी आतापर्यंत खूप प्रयत्न केले. परंतु, प्रणितीने तसा विचारच केला नाही. ती काँग्रेसशी प्रामाणिक आहे. गांधी आणि नेहरूंचे विचार जिथे आहेत ती तिथेच राहील. गांधी-नेहरूंच्या विचारांशी प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांची संख्या खूप आहे. प्रणितीसुद्धा त्यांच्यापैकीच एक आहे. ती विचारांनी कणखर आहे. पक्ष सोडून जाणं तिला पटत नाही. आतापर्यंत ज्या जनतेने आपल्याला तीन वेळा निवडून दिलं आहे त्या जनतेला आणि पक्षाला ती सोडून जाऊ इच्छित नाही.