उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या दसरा मेळाव्यात इतरही शिवसेना नेत्यांची भाषणं झाली. या भाषणांपैकी रामदास कदम यांचं भाषण चर्चेत आलं. कारण रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह दोन दिवस तसाच ठेवला होता. तसंच त्यांच्या हातांचे ठसे घेतले होते असा आरोप केला. या आरोपानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. रामदास कदम यांना मानसिक उपचारांची गरज आहे असं शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

सुषमा अंधारे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

रामदास कदम यांना मानसिक उपचारांची गरज आहे. कारण रामदास कदम फर्स्टेट झाले आहेत. रामदास कदम यांना सतत असं वाटतं की एकनाथ शिंदे त्यांच्या पाठिशी नाहीत. एकनाथ शिंदे आपल्याला वाचवू शकले असते असं त्यांना वाटतं. कोकणात उदय सामंत यांचं प्रस्थ वाढतं आहे. पण रामदास कदम यांचं दमन होतं आहे. उदय सामंत यांचं प्रस्थ वाढत असताना आपल्या मुलाचं काय होणार? कारण त्यांच्या मुलाच्या बारवर रेड पडली. एकनाथ शिंदे ही रेड वाचवू शकले नसते का? असं सुषमा अंधारे म्हणाल्या. झी २४ तास या वाहिनीच्या ‘टू द पॉईंट’ या मुलाखतीत वाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सुषमा अंधारे यांनी हे उत्तर दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत-सुषमा अंधारे

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांचं खूप जुळतं हे सगळ्यांना माहीत आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यामागे अमित शाह होते कारण फडणवीसांना त्यांना पुढे येऊ द्यायचं नाही. योगेश कदम यांच्या बारवर रेड पडण्याच्या आधी एकनाथ शिंदे हे अमित शाह यांना फोन करुन ती रेड उडवू शकले नसते? पण एकनाथ शिंदेंनी ती रेड अडवली नाही. माझा नेता उपमुख्यमंत्री आहे, अमित शाह यांचा निकटवर्तीय आहे असं असूनही योगेश कदम यांच्या बारवर रेड पडते आहे ही नामुष्कीची गोष्ट आहे. मग मी एकनाथ शिंदेंना अडचणीत आणलं पाहिजे असं रामदास कदम यांना वाटतं आहे. आत्ता ज्या पद्धतीने हे सगळं जे रामदास कदम बोलले आहेत याची भरपाई एकनाथ शिंदेंना करावी लागेल. कदमांचं काय उठाया झोला और चल दिया. रामदास कदम आधी राष्ट्रवादीबरोबर जातच होते ना? या सगळ्यामुळे एकनाथ शिंदेंचं नुकसान होईल. रामदास कदम वाह्यातपणे बोलले ते शिवसैनिकांना पटलेलं नाही. याचं उट्टं काढण्यासाठी शिवसैनिक त्वेषाने पेटून उठतील.” असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.