सांगली : उसाला विनाकपात टनाला ३७५१ रूपये आणि मागील हंगामातील उसाला प्रतिटन २०० रूपयांचा हप्ता मिळाल्याशिवाय यंदाचा गळित हंगाम सुरू होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी दिला. या मागणीचे निवेदन सांगलीतील दत्त इंडिया संचलित वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद मोर व मृत्यूंजय शिंदे यांना देण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या २४व्या ऊस परिषदेत मांडलेल्या भूमिकेचा पाठपुरावा करत ही मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षभरात साखरेचा दर ३८०० प्रति क्विंटलपर्यंत गेला असून, इथेनॉल, अल्कोहोल, बगॅस, मोलॅसिसमधून कारखान्यांनी कोट्यवधींचा नफा कमावला आहे. तरी देखील शेतकऱ्यांना न्याय्य दर न मिळणे हा शेतकर्यांच्या मेहनतीचा अपमान आहे. तसेच २५ किलोमीटरपर्यंतच वाहतूक कपात मर्यादित ठेवावी आणि २५ किलोमीटर क्षेत्रासाठी ७५० कपात मान्य, त्यापलीकडील वाहतूक खर्च शेतकर्यांवर टाकू नये, अशी मागणी करण्यात आली. चालू हंगामासाठी कारखान्यांनी १० नोव्हेंबरपर्यंत दर जाहीर करावा, यानंतर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या वेळी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा, बजरंग पाटील, विक्रम पाटील, भास्कर कदम, बाळासो पाटील, संजय बेले, जगन्नाथ भोसले, मनोहर पाटील, प्रताप पाटील, बुवा भगत, अरुण बंडगर, पांडुरंग इंगळे, मयूर पाटील, महादेव पाटील, धन्यकुमार पाटील, रोहित पाटील, सचिन यादव, बटुदादा फाळके, रामदास महिंद, अमोल पाटील, अजमुद्दिन मुजावर, प्रदीप पाटील नामदेव पाटील, श्रीकांत पाटील आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, यंदाचा उस गाळप हंगाम एक नोव्हेंबर पासून सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मात्र, तत्पुर्वी जिल्ह्यातील विश्वास, सोनहिरा, मोहनराव शिंदे, उदगिरी शुगर, जतमधील राजारामबापू युनिट चार या साखर कारखान्याचा गाळप शुभारंभ गेल्या दोन दिवसात करण्यात आला आहे. कर्नाटकातील साखर कारखाने दिवाळीपासून सुरू झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील उस कर्नाटकातील कारखान्याकडून गाळपासाठी नेला जाण्याची शक्यता लक्षात घेउन जिल्ह्यातील साखर कारखाने लवकर सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. येत्या आठ दिवसात जिल्ह्यातील सर्वच कारखान्याचे गाळप सुरू होतील. उस तोडीसाठी मजूरांच्या टोळ्या कारखान्याच्या कार्यस्थळावर दाखल होऊ लागल्या असून हंगाम सुरू करण्याची धांदल सुरू आहे. यातच सध्या पावसाचे अधूनमधून आगमन होत असून यामुळे उसतोडीसाठी वाटेचा प्रश्न निर्माण होणार आहे.
