चिपळूण – कोकण रेल्वेमार्गावरील ‘प्रीमियम’ श्रेणीच्या तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना नाश्त्याऐवजी १० रुपयांचा बिस्कीट पुडा देण्यात आल्याचे समोर आले. जेवणातही निश्चित पदार्थांऐवजी वेगळ्याच पदार्थांचे ताट पुढे आल्याने प्रवाशांच्या त्रासात आणखी भर पडली. एका त्रासलेल्या प्रवाशाने ‘तेजस’ मधील रेल्वे अधिकाऱ्याकडे तक्रार केली, मात्र त्याच्या उत्तराने प्रवाशाचे समाधान झाले नाही. ‘रेल्वे मदत’ आणि ‘पीजी पोर्टल’वर तक्रार करून प्रवासी आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
दिवाळी सणानंतर कोकणातून मुंबईत येण्यासाठी श्रेयस पटवर्धन यांनी शनिवारी तेजस एक्स्प्रेसचे आरक्षण केले. वेळापत्रकानुसार कुडाळ स्थानकात सायंकाळी ५ वाजता येणारी गाडी एक तास विलंबाने दाखल झाली. विलंबाबाबत प्रवाशांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मुंबईच्या दिशेने गाडी रवाना झाल्यावर सायंकाळच्या नाश्त्याचे वाटप सुरू झाले. ‘आयआरसीटीसी’ मार्फत जाहीर झालेल्या नाश्त्याच्या पदार्थांनुसार एक कचोरी किंवा समोसा आणि व्हेज सँडविच असणे अपेक्षित होते. त्याचबरोबर प्रीमिक्स चहा किंवा कॉफी, कॅरमल पॉपकॉर्न आणि पॅकेज ड्रिंक यांचाही समावेश पदार्थांच्या यादीत होता.
मात्र, प्रत्यक्षात प्रवाशांना १० रुपयांचा साधा बिस्कीट पुडा, एक पाकीट मसाला शेंगदाणे, एक शीतपेय आणि एक डीप चहा एवढेच देण्यात आले. नाश्त्याबाबत प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर गाडीत नाश्ता कमी प्रमाणात आल्याने बिस्कीट देण्यात आले, असे गाडीतील व्यवस्थापकाने सांगितले.
सायंकाळच्या नाश्त्यानंतर रात्रीच्या जेवणातही गोंधळ होता. तेजसच्या तिकीट आरक्षणात जेवणासाठी ‘आयआरसीटीसी’च्या पदार्थांमध्ये काश्मिरी पुलाव, नवरतन कुर्मा, दाल तडका, आलू शिमला किंवा आलू गाजर / मटार, तीन चपात्या किंवा दोन पराठे, गोड शिरा, दही, लोणचे, मीठ अशी थाळी दिली जाणे अपेक्षित होते. त्यानुसारच जेवणाचे पैसे घेण्यात आले. प्रत्यक्षात प्रवाशांना जीरा राइस, चिवट पनीर, दही, शिरा, बटाट्याचे चार तुकडे, तीन चपात्या आणि डाळ असे जेवण देण्यात आले. हे जेवण जाहीर केलेल्या पदार्थांनुसार नाही,अशी तक्रार केली असता कोणताही रेल्वे अधिकारी फिरकला नाही.
तेजस एक्स्प्रेसमधील नाश्ता आणि जेवणासंबंधीची तक्रार ‘रेल मदद’ वर करण्यात आली. संबंधित प्रवाशांना भेटून तक्रार सोडवण्यात आली, असे सांगून तक्रार बंद करण्यात आली आहे. आता श्रेयस यांनी ‘पीजी पोर्टल’वर तक्रार दाखल केली आहे.
घोटाळा नाही तर काय ?
‘कोणत्याही गाडीमध्ये असे होणे चुकीचे आहे. हा घोटाळा नाही तर काय आहे’, असा प्रश्न उपस्थित करत श्रेयस पटवर्धन यांनी याबाबतची तक्रार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, जागो ग्राहक, आयआरसीटीसी यांच्या ‘एक्स’ हँडलवर टॅग केली आहे.
या संदर्भात आमच्याकडे कोणतेही लेखी तक्रार आलेले नाही. ज्या तक्रारी येतात त्या चौकशीसाठी आम्ही संबंधित विभागाकडे पाठवतो. प्रवाशांचा मोबाईल नंबर असेल तर चौकशी अहवाल आम्ही त्यांनाही देतो. तेजस रेल्वेच्या केटरिंग संदर्भात आमच्याकडे कोणतीही तक्रार नाही. – सुनील नारकर, जनसंपर्क अधिकारी कोकण रेल्वे
