राहाता : लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या प्रवरा अभिमत विद्यापीठात पदव्युत्तरच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या तेलंगणातील विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने समिती स्थापन केली आहे. समितीचा अहवाल येईपर्यंत संस्थेने बालरोगशास्त्र विभागप्रमुखांना निलंबित केल्याची माहिती विद्यापीठाने एका पत्राद्वारे दिली.
विद्यापीठाचे निबंधक व डॉ. बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या संयुक्त स्वाक्षरीने हे पत्र जारी केले आहे. विनोदकुमार किशोर गौड (वय ३० रा. तेलंगणा) असे मृत विद्यार्थाचे नाव आहे. हा विद्यार्थी प्रवरा अभिमत विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणातील बालरोग विभागात पदव्युत्तरच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. तो वसतिगृहात राहत होता. त्याने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली, त्याचे कारण अद्याप उघड झालेले नाही. या विद्यार्थ्याच्या आत्महत्येसंदर्भात तसेच विद्यापीठाच्या कारभारा संदर्भातही समाज माध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत असल्याने चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने आज चौकशी समिती स्थापन केली आहे.
या घटनेसंदर्भात प्रवरा अभिमत विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या पत्रात पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. विनोद कुमार गौड यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या घटनेबाबत समाज माध्यमावर व्यक्त होणाऱ्या भावना आणि चिंता आम्हाला समजतात. परंतु, या घटनेबाबत कुणीही लगेचच निष्कर्ष काढू नयेत किंवा पडताळणी न केलेले आरोप पसरवू नयेत. यातून संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबालाही मानसिक त्रास होत आहे. तसेच यातून निष्पक्ष आणि सखोल चौकशीत अडथळा येऊ शकतो. या सर्व प्रकाराची दखल व्यवस्थापनाने घेतली असून, चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने समिती स्थापन केली आहे.
या समितीचा अहवाल येईपर्यंत संस्था बालरोगशास्त्र विभागप्रमुखांना निलंबित करत आहे. पारदर्शकतेसाठी संस्था सर्व वैधानिक आणि नियामक संस्थांना पूर्ण सहकार्य करत आहे. विद्यार्थी आणि कर्मचारी निर्भयपणे तक्रारी मांडू शकतील. यासाठी आधीच अस्तित्वात असलेली गोपनीय यंत्रणा अधिक मजबूत केली जाईल. आमचे विद्यार्थी व रहिवाशांचे कल्याण आणि मानसिक आरोग्य आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यापीठ शिक्षण आणि व्यावसायिक वाढीसाठी सुरक्षित आणि सहायक वातावरण निर्माण करण्यास वचनबद्ध आहे. आम्ही धीर धरण्याची विनंती करतो आणि सर्व भागधारकांना खात्री देतो की, निष्कर्षांच्या आधारे योग्य कारवाई केली जाईल, असे विद्यापीठाने पत्रात म्हटले आहे.