बुलढाणा : खडतर अर्थात जास्त काठीण्य पातळी असणारी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारासाठी ही बातमी महत्वाची आहे. परिश्रम, सखोल अभ्यास, नियोजन, कुशाग्र या चारसूत्रीच्या पाठबळावर ही परीक्षा पास करणाऱ्या भावी गुरुजींना पात्रता प्रमाणपत्राची मागील तब्बल सहा महिन्यापासून आतुरतेने प्रतीक्षा होती. परीक्षेचा ऑनलाईन निकाल सहा महिन्यापूर्वी जाहिर होऊनही हाती प्रमाणपत्र मिळाले नाही. एक दोन महिने नव्हे तब्बल सहा महिन्यापासून उमेदवारांची प्रतीक्षा कायम होती. त्यांचे जीव टांगणीला लागले होते.
जितकी ही परीक्षा किचकट तेवढीच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांची कार्यपद्धती ‘विचित्र’ म्हणावी अशीच आहे. याचे कारण महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने मागील १० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टेट) घेण्यात आली होती. बुलढाणा जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा ११ केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल तब्बल तीन महिन्यांनी लागला.
निकाल १४ फेब्रुवारी २०२५ रोजी परिषदेकडून ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता. मात्र पुन्हा प्रतीक्षा आली. मागील सहा महिन्यापासून उमेदवारांची प्रमाणपत्र साठी प्रतीक्षा करावी लागली.
अखेर मुहूर्त जाहीर
आता कुठे ही प्रमाणपत्र मिळण्याचा मुहूर्त जाहीर झाला असून मनाची घालमेल होत असलेल्या उमेदवारांना ती मिळण्याचा मुहूर्त जाहीर झाला आहे. सदर परीक्षेत पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्रे राज्य परीक्षा परिषदेकडून बुलढाणा जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयास एकदाची प्राप्त झाली आहे. त्यांचे वितरण १ ते ९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत कार्यालयीन वेळेत होणार आहे. उमेदवारांना प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी स्वतः उपस्थित राहावे लागणार आहे असल्याची माहिती शिक्षणाधिकारी(प्राथमिक) विकास पाटील यांनी दिली आहे.
ही कागदपत्रे सोबत गरजेची
प्रमाणपत्र प्राप्त करताना उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र, गुणपत्रिका, डी.टी.एड, बी.एड उत्तीर्ण गुणपत्रक, आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, माजी सैनिकांचा पुरावा (लागू असल्यास) तसेच आधार, पॅन,मतदार ओळखपत्र इत्यादी ओळखपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. सदर कागदपत्रांशिवाय प्रमाणपत्र दिल्या जाणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे बुलढाणा परीक्षा केंद्रांवर उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पेपर१ व पेपर-२ ची यादी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.