येत्या ३० जानेवारी रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांवर निवडणूक होणार आहे. नाशिकसह कोकण, अमरावती, नागपूर आणि पुणे या पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात ही निवडणूक पार पडणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. सर्व पक्षाकडे मी पाठिंबा देण्यासाठी विनंती करणार आहे, असं सत्यजित तांबे यांनी म्हटलं होतं.

या निवडणुका अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अद्याप भारतीय जनता पार्टीने सत्यजित तांबे यांना जाहीरपणे पाठिंबा दिला नाही. त्यामुळे या जागेबाबत सस्पेन्स कायम आहे. आधी भाजपामध्ये पक्षप्रवेश करा, मग पाठिंबा देऊ अशी भूमिका भाजपाने घेतली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. या सर्व घटनाक्रमानंतर ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- नाना पटोलेंच्या ‘त्या’ दाव्यावर सत्यजित तांबेंचे थेट विधान; म्हणाले, “जेव्हा सत्य सांगेन तेव्हा चकित व्हाल, लवकरच…”

भारतीय जनता पार्टी सत्यजित तांबेंचा गेम करणार आहे, हे आम्हाला आधीपासून माहीत होतं. भाजपाचा फसवणुकीचा कार्यक्रम नवीन नाही. पण येत्या निवडणुकीत भाजपा उघडी पडेल, अशी प्रतिक्रिया मनिषा कायंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा- पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार कोण असणार? चंद्रकांत पाटलांनी दिले संकेत; म्हणाले, “भाऊंच्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील सस्पेन्सबाबत विचारलं असता मनिषा कायंदे म्हणाल्या, “भारतीय जनता पार्टीचे फसवणुकीचे कार्यक्रम नवीन नाहीयेत. अशाच पद्धतीने त्यांनी शिवसेनेला वारंवार फसवण्याचं काम केलं आहे. ही लोक शब्दाचे पक्के नाहीत. सत्यजित तांबेंचा गेम होणार आहे, हे आम्हाला आगोदरच समजलं होतं. भाजपाने वेळोवेळी महाविकास आघाडीला बदनाम करण्याचं काम केलं आहे. पण महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार शिक्षक व पदवीधर मतदारसंघातून निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी नक्की उघडी पडेल.”