सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यात वारंवार होणाऱ्या वीज खंडित समस्येने नागरिक आणि व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे, विशेषतः गणेशोत्सवाच्या तोंडावर गणेश मूर्ती बनवणाऱ्या चित्रशाळांचे मोठे नुकसान होत आहे. या गंभीर प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने एक आगळेवेगळे आंदोलन हाती घेतले आहे. येत्या १० ऑगस्ट रोजी मळेवाड आणि १५ ऑगस्ट रोजी सावंतवाडी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर सत्यनारायण महापूजा आणि महाआरती करून थेट देवालाच साकडे घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
सातत्याने होणारी वीज कपात आणि स्मार्ट मीटरमुळे येणारी भरमसाठ बिले यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पालकमंत्री स्तरावर बैठका होऊनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने ठाकरे गट संतप्त झाला आहे. आंदोलकांच्या मते, “वीज वितरण कंपनीचा बेजबाबदारपणा आणि ग्राहकांना विश्वासात न घेण्याची वृत्ती यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत.” एकीकडे विजेचा लपंडाव सुरू असताना, दुसरीकडे सावंतवाडी तालुक्यात सुमारे चार हजार स्मार्ट मीटर ग्राहकांच्या माथी मारण्यात आले आहेत, ज्यामुळे बिलांमध्ये मोठी वाढ झाल्याची तक्रार आहे.
या आंदोलनाविषयी माहिती देताना ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी सांगितले की, वेंगुर्ले येथे सावंतवाडी तालुक्यातील १५ गावे जोडल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. मळेवाड सब स्टेशनवर शिवसेनेच्या वतीने १० ऑगस्ट रोजी सत्यनारायण महापूजा व महाआरती करण्यात येईल, तर सावंतवाडी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात वीज वितरण कंपनी १५ ऑगस्ट रोजी सत्यनारायण महापूजा घालेल, तेथे शिवसेनेच्या वतीने महाआरती केली जाईल.
राऊळ यांनी स्पष्ट केले की, “वीज वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी आणि गणेश चतुर्थीच्या सणात वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आम्ही देवाकडे साकडे घालणार आहोत.” गेल्या वर्षांपासून वीज वितरण कंपनीच्या विरोधात शेकडो आंदोलने झाली असली तरी, कंपनीच्या कार्यपद्धतीत कोणताही बदल झाला नाही. त्यामुळेच आम्ही आता थेट देवालाच प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला आहे.
राऊळ यांनी पुढे नमूद केले की, वीज वितरण कंपनीने विजेच्या लपंडावाकडे लक्ष देण्याऐवजी स्मार्ट मीटर ग्राहकांच्या माथी मारल्याने त्यांच्या कारभाराचे पितळ उघड पडले आहे. यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार आणि उप तालुका प्रमुख अशोक धुरी हे देखील उपस्थित होते. या अनोख्या आंदोलनामुळे वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराकडे सरकारचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.