राज्यातील दोन सत्र न्यायाधीशांना मुंबई उच्च न्यायालयाच्या तपास समितीने बडतर्फ केलं आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांना लाचखोरीच्या आरोपात तर सध्या पालघर जिल्हा सत्र न्यायालयात सेवेत असलेल्या इरफान शेख यांच्यावर अंमली पदार्थांचं सेवन आणि तस्करी केल्याच्या आरोपांखाली ही कारवाई करण्यात आलीय. या दोघांना १ ऑक्टोबरपासूनच सेवेतून बडतर्फ केल्याचे आदेश काढण्यात आलेत.
कॉर्डिलिया क्रुझवर नशेत आढळले होते न्यायाधीश इरफान शेख
आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या कॉर्डिलिया क्रुझवर एका न्याय दंडाधिकाऱ्यालाही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं, मात्र त्याला गुप्तपणे बाहेर काढण्यात आल्याचा दावा करत आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केलीय, जी अद्याप न्यायप्रविष्ट आहे. हे दंडाधिकारी महाशय क्रुझवर नशेत इतके चूर होते की, त्यांना थेट रुग्णालयात नेण्यात आल्याचा दावाही याचिकेतून करण्यात आलाय. इतकंच नव्हे तर अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी इरफान शेख हे बलार्ड पीअर येथील NDPS कोर्टात कार्यरत असताना त्यांच्या कोर्टात एनसीबीनं जप्त केलेला मुद्देमाल जो पुरावा म्हणून ठेवण्यात येतो, त्या अंमली पदार्थांवर थेट डल्ला मारून त्याचं स्वत:ही सेवन करीत तसेच ते बॉलिवूडमधील आपल्या काही मित्रांमध्येही वाटत असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आलाय. माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
इरफान शेख यांना करण्यात आलं बडतर्फ
पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ ज्यांच्या ताब्यात ठेवले जातात त्या न्यायाधीशांनीच या अंमली पदार्थांच सेवन केल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीला आढळून आल्यानंतर इरफान शेख नावाच्या न्यायाधीशांना बडतर्फ करण्यात आलं. न्यायाधीशांनी जर अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं तर फक्त बडतर्फीचीच कारवाई का करण्यात आली. इतर आरोपींना जशी अटक होते तशी अटक इरफान शेख यांना का झाली नाही? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. खुद्द न्यायाधिशांनीच अंमली पदार्थांच सेवन करण्याचा हा प्रकार मुंबईतील बहुचर्चित कॉर्डीलीया क्रुझ प्रकरणाशी संबंधित आहे.
आर्यन खान ज्या क्रूझवर होता तिथेच होते इरफान शेख
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यावेळी एनसीबीचे प्रमुख असलेल्या समीर वानखेडेंच्या टीमने कॉर्डिलीया क्रुझवरुन अटक केली होती. त्यावेळी कॉर्डिलीया क्रुझवर इरफान शेख हे न्यायाधीश देखील होते. इरफान शेख यांनी त्यावेळी अंमली पदार्थांचे सेवन केलं होतं. मात्र समीर वानखेडेंच्या टीमने इरफान शेख यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि इरफान शेख यांना गुपचुपपणे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारांसाठी इरफान शेख यांच्या ब्लड आणि युरिन टेस्ट करण्यात आल्या असता त्यामधे त्यांनी कोकेन या अंमली पदार्थांच सेवन केल्याचे समोर आलं होतं. माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी इरफान शेख यांच्या चाचण्यांचे रिपोर्ट मिळवुन त्यांच्यावर कारवाईची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ज्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीने बडतर्फीची कारवाई केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनेही दोन न्यायाधीशांवर बडतर्फीची कारवाई केल्याचं वृत्त दिलं आहे.