The farmers organizations expect that the state government will provide relief to the farmers on the sugarcane issue | Loksatta

राज्यशासन ऊसदर प्रश्नी शेतकऱ्यांना दिलासा देईल; शेतकरी संघटनांची अपेक्षा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकरी, शेतीप्रेमी असल्याने ते शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतील, असा विश्वास शेतकरी संघटनांना आहे.

राज्यशासन ऊसदर प्रश्नी शेतकऱ्यांना दिलासा देईल; शेतकरी संघटनांची अपेक्षा
संग्रहित छायाचित्र

राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी ऊसदरासह अन्य मागण्यांसाठी येत्या मंगळवारी (दि. २९) मुंबईत बैठक बोलावली आहे. यात ऊसदरासंदर्भात राज्य शासनाची ठोस भूमिका स्पष्ट होऊन शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय होतील अशी अपेक्षा शेतकरी संघटनांना आहे.

हेही वाचा- ‘विकासभिमुख कारभारामुळे विरोधकांमध्ये जळफळाट’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल शुक्रवारी कराड दौऱ्यावर असताना उसाला किमान साडेतीन हजार रुपये प्रतिटन दर आणि अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘स्वाभिमानी’चे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात झालेल्या चर्चेवेळी शेट्टी यांनी सबुरी दाखवली. तर, ‘स्वाभिमानी’च्या मागण्यांसंदर्भात राज्याच्या सहकारमंत्र्यांनी मंगळवारी बैठकीचे निमंत्रण दिल्याने शेट्टी यांनी चक्काजाम आंदोलन तूर्तास स्थगित केले. मात्र, बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा फैसला न झाल्यास आम्ही चक्काजाम आंदोलनावर ठाम असल्याचा शेट्टी यांचा इशारा आहे.

हेही वाचा- “आजचं भाषण म्हणजे वैफल्यग्रस्त…” अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!

दरम्यान, कराडमध्ये बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील विविध शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडल्या. राज्यातील ‘महाविकास आघाडी’ने ‘एफआरपी’चे तुकडे करण्याचा केलेला कायदा रद्द करण्याबरोबरच साखर कारखान्यांमधील अंतराची अट काढून टाकावी. शेतीपंपाला दिवसा १० तास वीज द्यावी, शेतकरी आंदोलनातील गुन्हे काढून घ्यावेत, शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान तत्काळ दिले जावे अशा मागण्या करत मुख्यमंत्र्यांना त्याबाबतचे निवेदन दिले. पालकमंत्री शंभूराज देसाई, रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन नलवडे, ‘बळीराजा’चे विश्वास जाधव, चंद्रकांत यादव, उत्तम खबाले, ‘स्वाभिमानी’चे देवानंद पाटील आदी यावेळी उपस्थित होते. यानंतर बोलताना पंजाबराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकरी, शेतीप्रेमी असल्याने त्यांना ग्रामीण जनतेच्या वेदनांची जाणीव असावी आणि त्यामुळेच ते शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतील, असा आमचा ठाम विश्वास आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 21:58 IST
Next Story
‘विकासभिमुख कारभारामुळे विरोधकांमध्ये जळफळाट’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका