सोलापूर : जनावरांच्या बाजारात विकलेल्या बैलाचे पैसे न देता स्वतःकडे ठेवून घेतल्यामुळे संतापलेल्या मुलाने आपल्या वृद्ध वडिलांचा खून केल्याची घटना बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गावात घडली.

रावण सोपान खुरंगुळे (वय ७०) खून झालेल्या वृद्ध पित्याचे नाव आहे. त्याच्या मुलाविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. कोरडवाहू शेती करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या मृत रावण खुरंगुळे हे वंशपरंपरेने पोतराज होते.

याबाबत गावचे पोलीस पाटील राहुल नारायण लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सकाळी ७.१५ च्या सुमारास रावण खुरंगुळे हे आपल्या घरासमोर बेशुद्ध अवस्थेत निपचित पडल्याची कुजबूज कानावर आली असता पोलीस पाटलांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी रावण खुरंगळे यांच्या डोक्यावर, डोळ्यांवर, कानावर, पाठीवर आणि हातावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या. शेजारी काठी पडली होती. मृताच्या घराच्या एका खोलीचा दरवाजा आतून बंद होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस पाटलांनी हाका मारल्यानंतर मृताचा मुलगा दरवाजा उघडून बाहेर आला. दारात तुझा बाप मेला आहे आणि तू घरात कसा झोपलास, असे विचारले असता मुलाने संतापाच्या भरात, मरू दे त्याला, काल बार्शीच्या जनावरांच्या बाजारात वडिलांनी बैल नेऊन विकले. पण त्याचे पैसे मला दिले नाहीत. म्हणून मीच त्याला काठीने आणि पोतराजाच्या वाकीने मारल्याची धक्कादायक कबुली प्रत्यक्ष साक्षीदारांसमोर दिली. मृत रावण खुरंगुळे यांच्या मृतदेहावर बार्शीच्या उपजिल्हा रुग्णालयात न्याय वैद्यक तपासणी करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे करीत आहेत.