पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास संथ गतीने सुरू असला, तरी ते दोन-तीन दिवसांत केरळमध्ये दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे. मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाच्या या काळामध्ये सोमवारपासून राज्यातील काही भागांत मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्रात गेल्या दोन दिवसांपासून आगेकूच केली. या वाऱ्यांनी दक्षिण अरबी समुद्राचा बहुतांश भाग व्यापला असून, लक्षद्वीपपर्यंत मजल मारली आहे. श्रीलंकेचा अर्धा भाग व्यापून ते भारतभूमीच्या जवळ पोहोचले आहेत. मात्र, शनिवारी (२८ मे) मोसमी वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केली नाही. बंगालच्या उपसागरात दोन दिवसांपासून त्यांची प्रगती थांबली आहे. या वाऱ्यांच्या प्रवासासाठी पोषक वातावरण असून, ते पुढील काही तासांमध्ये पुन्हा प्रगती करतील आणि दोन-तीन दिवसांत केरळमधून भारतात प्रवेशतील, असा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे.

दक्षिण अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे सध्या केरळसह दक्षिणेकडील काही भागांत आणि किनारपट्टीवर जोरदार पाऊस होत आहे. पूर्वेकडील राज्यांमध्येही सध्या पावसाळी स्थिती आहे. महाराष्ट्रात सध्या दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण होत आहे. दुपारी उन्हाचा चटका जाणवत असून, कोकण आणि विदर्भात काही भागांत कमाल तापमानात वाढ झाली आहे. ३० मेपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या प्रामुख्याने दक्षिण भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. काही भागांत सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

पाऊस कोणत्या जिल्ह्यांत…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये ३० मे ते १ जून या कालावधीत तुरळक भागात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य-पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.