सावंतवाडी: यंदा २७ ऑगस्ट रोजी येणाऱ्या गणेशचतुर्थीसाठी अवघे दीड महिना शिल्लक असताना सावंतवाडीतील गणेश मूर्तीशाळांमध्ये लगबग सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, यंदा ग्रामीण भागातून मातीच्या गणेशमूर्तींना मोठी मागणी असून, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (POP) मूर्तींना मात्र विरोध होताना दिसत आहे.
सध्या गणेशमूर्ती घडवणारे अनेक कलाकार शेती आणि बागायतीच्या कामात व्यस्त असले तरी, गणेशोत्सव अगदी जवळ आल्याने मूर्तीशाळा वेगाने सुरू झाल्या आहेत. पूर्वी नागपंचमीपूर्वी काही दिवस ‘बैठक पाट’ मूर्तीशाळेत नेण्याची प्रथा होती, जी आता बदलली आहे. आता मूर्ती घरी नेतानाच पाट आणला जातो, त्यामुळे पूर्वी महिनाभर मूर्तीशाळांमध्ये दिसणारी लगबग काही प्रमाणात कमी झाली आहे.
यंदा गणेशमूर्तींच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. माती,रंग, कारागिर आणि वीज दरांमधील वाढ हे यामागचे मुख्य कारण आहे. शासनामार्फत आता कलाकार आणि शाळांना अनुदान देण्याची तरतूद असल्याने त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
सध्या मूर्तिकारांची जिल्हास्तरीय संघटना स्थापन झाली असून, या संघटनेमार्फत मुलांना गणेशमूर्ती कशा बनवायच्या याचे प्रात्यक्षिकही दाखवले जात आहे. जिल्ह्यात जवळपास हजारहून अधिक मूर्तीशाळा आहेत. पूर्वी माती तयार करून मूर्ती घडवल्या जात असत, पण आता अनेक शाळांमध्ये तयार गणेशमूर्ती पाहायला मिळतात.
माती सहज उपलब्ध होत नसल्याने काही गणेश शाळांमध्ये POP च्या मूर्ती आणल्या जातात, अशी माहिती आहे. तसेच, कुशल कारागीर मिळेनासे झाल्यामुळे आणि विजेच्या सततच्या लपंडावामुळेही चित्रशाळांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पर्यावरणाची काळजी घेण्याचे आवाहन:
भक्तांमध्ये मातीच्या गणेशमूर्तींना पसंती देण्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पर्यावरणाची काळजी. मातीच्या गणेशमूर्ती पाण्यात सहज विरघळतात, ज्यामुळे विसर्जनाचा आनंद द्विगुणीत होतो. याउलट, POP च्या गणेशमूर्ती विसर्जनानंतर तलाव, ओहोळ आणि नद्यांमध्ये भग्नावस्थेत आढळून येतात, ज्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. त्यामुळे, यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणाची काळजी घेत मातीच्या मूर्तींना प्राधान्य देण्याचे आवाहन केले जात आहे.
याबाबत सावंतवाडी भटवाडी येथील चित्रकार श्री. उदय अळवणी दरवर्षी ३५० ते ४०० मातीच्या श्री गणेश मुर्ती तयार करतात. त्यांनी दिड महिन्यांपूर्वीच कामाला सुरुवात केली आहे. ते म्हणाले, सध्या बाजारपेठेत महागाई वाढली आहे. माती, रंग, कारागिर आणि वीज महागाई अशा वाढलेल्या दरामुळे मुर्तीची किमान किंमत वाढते. यंदा श्री गणेश मुर्ती ची किंमत दरवर्षी पेक्षा २५ ते ३० टक्क्यांनी वाढ होईल.