राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असं वक्तव्य करून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाद ओढावून घेतला आहे. याविरोधात भाजपा आक्रमक झाली असून ठिकठिकाणी आव्हाडांविरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष ठाकरे गट अडचणीत आल्याची चर्चा आहे. दरम्यान, यावर ठाकरे गटाचे विधान परिषदेच आमदार अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“आम्ही जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाहीत”, असं अंबादास दानवे म्हणाले. तसंच, “याविरोधात रस्त्यावर उतरण्याची गरज वाटत नाही. या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. प्रभु श्रीरामाविषयी जपून बोललं पाहिजे. प्रभू श्रीराम आदर्श आहेत, आदर्शपुरुष आणि महापुरुष म्हणून देशात त्यांचा सन्मान होतो. त्यामुळे आदर्शांविषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावं”, असंही अंबादास दानवे म्हणाले.

हेही वाचा >> “जितेंद्र आव्हाडांवर २४ तासांत गुन्हा दाखल करा, अन्यथा वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर…”, अजित पवार गटाचा इशारा

जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे भाजपा आक्रमक झाली आहे. महायुती सरकारकडून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. त्यामुळे याविरोधात शरद पवारांकडे तक्रार करणार का असा प्रश्न विचारला असता दानवे म्हणाले, “शरद पवारांकडे तक्रार करणार का याबाबत मी कॅमेरासमोर सांगण्याची आवश्यकता नाही.”

“जे गोमांसाचं समर्थन करतात त्यांनी (भाजपा) हिंदुत्त्वाच्या गोष्टी सांगायची गरज नाही. गोमांसाविषयी गोव्याचे मुख्यमंत्री आणि किरण रिजिजू काय बोलले आहेत ते माहितेय आम्हाला”, अशी टीकाही अंबादास दानवे यांनी भाजपावर केली.

“मांसाहार तुम्ही सर्वांनी सोडलेलं आहे का? मांसाहार करणारेही आंदोलन करतात. गणपतीच्या दिवशी मांसाहार करत असल्याचं कित्येक आंदोलकांच्या घरात पाहिलं आहे. चतुर्थीच्या दिवशीही मांसाहार केलेला पाहिला आहे. चतुर्थीच्या दिवशी मटण खाणारे आणि कोंबड्या कापणारे आम्हाला काय शिकवणार?”, असा हल्लाबोलही अंबादास दानवे यांनी भाजपावर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा…

जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासांत गुन्हा दाखल केला नाही तर वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या बाहेर महाआरती केली जाईल असा इशारा अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहरी होता असं वक्तव्य केलं. त्यानंतर आता भाजपा आक्रमक झाली आहे तर अजित पवार गटानेही जितेंद्र आव्हाडांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आता या प्रकरणी थेट इशाराच दिला आहे.