बॉलिवडूचा दबंग अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी रविवारी पहाटे गोळीबार केला. या गोळीबारात अभिनेता सुरक्षित असला तरी, गेल्या काही वर्षांत सलमानला सातत्याने धमक्या मिळत आहेत. त्यामुळे बॉलिवूडचा टायगर असलेला सलमान खान गँगस्टरच्या रडारवर का आहे असा प्रश्न उपस्थित होतो.
आज काय घडलं?
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाला. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचं सांगितलं जात आहे. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे ४.५१ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
गेल्या महिन्यात मिळाली होती धमकी
मार्च २०२४ मध्ये, सलमानच्या मॅनेजरला धमकीचा मेल आला होता. याप्रकरणी तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, कॅनडातील गँगस्टर गोल्डी ब्रार आणि बिश्नोईचा जवळचा सहकारी मोहित गर्ग यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. मोहित गर्गच्या आयडीवरून आलेल्या ईमेलमध्ये ब्रारला सलमानशी बोलायचे होते. ईमेलमध्ये म्हटले होते की की जर सलमानला हे प्रकरण बंद करायचे असेल तर त्याने ब्रारशी समोरासमोर बोलावे. तसंच, पुढच्या वेळी याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही देण्यात आला होता.
हेही वाचा >> सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर पहाटे गोळीबार, पोलिसांनी सुरक्षा वाढवली
गेल्यावर्षी मॉर्निंग वॉकदरम्यान मिळाले होते पत्र
जून २०२२ मध्ये, वांद्रे बँडस्टँडवर सलमान खानचे वडील सलीम खान मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या धमकीच्या पत्रात असा दावा करण्यात आला होता की, अभिनेता गायक सिद्धू मूसवाला मे २०२२ मध्ये मारला गेला होता. त्याला बिश्नोई टोळीने मारले होते. या पत्राप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला होता. जो कथितपणे बिश्नोई टोळीने मारला होता.
पंजाब पोलिसांच्या चौकशीदरम्यान, बिश्नोई टोळीच्या सदस्याने सांगितले होते की दोन जणांनी सलमान खानच्या मुंबईहून त्याच्या पनवेल फार्महाऊसकडे जाण्याच्या मार्गावर रेकी केली होती. या कामासाठी दोघांनी एक महिन्यासाठी भाड्याने खोली घेतल्याचे त्यांनी सांगितले.
सलमान खान लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर का आला?
राजस्थानमध्ये ‘हम साथ-साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान १९९८ च्या काळवीटची हत्या केल्याचा आरोप सलमान खानवर करण्यात आला होता. यामुळे बिश्नोईने त्याला सातत्याने धमकी दिली होती. बिश्नोई समाजात काळ्या हरणांना पवित्र मानले आहे; त्यामुळे काळवीटची हत्या केल्याचा आरोप लागल्यापासून अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर होता. परंतु, इतर सर्व टोळ्यांप्रमाणे बिश्नोईची टोळीही सातत्याने चर्चेत राङण्याकरता हाय प्राफोईल लोकांना टार्गेट करते, असं तपास यंत्रणांनी सांगितलं आहे.
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
बिश्नोई (३१) हा पंजाबमधील गुंड असून त्याच्यावर खून आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मूसेवालाच्या हत्येनंतर बिश्नोई अधिक प्रसिद्ध झाला. ब्रारने हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्याची योजना बिश्नोईबरोबर तुरुंगात आखण्यात आली होती, असं ब्रारने तपासादरम्यान स्पष्ट केलं होतं.
सलमानच्या सुरक्षेकरता उपाययोजना काय?
सलमान खानला मिळालेल्या धमक्यांनंतर, मुंबई पोलिसांनी ऑगस्ट २०२२ मध्ये अभिनेत्याला स्वसंरक्षणासाठी बंदुक परवाना जारी केला. नोव्हेंबर २०२२ मध्ये, महाराष्ट्र सरकारने त्याची सुरक्षा स्तर X श्रेणीतून Y प्लस श्रेणीमध्ये श्रेणीसुधारित केली.
X श्रेणीच्या सुरक्षेमध्ये एक बंदूकधारी असतो, तर Y कडे मोबाइल सुरक्षेसाठी एक बंदूकधारी असतो आणि स्थिर सुरक्षेसाठी एक (अधिक चार रोटेशनवर) असतो. Y+ मध्ये मोबाईल सुरक्षेसाठी दोन पोलिस (अधिक चार फिरताना) आणि निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी एक (फिरवताना अधिक चार) आहेत.