लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : बार्शी तालुक्यातील एका वयोवृद्ध नेत्याला धमकावत १५ लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार सोलापुरात घडला. याप्रकरणी संबंधित नेत्याच्या मुलाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार एका महिलेसह तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात बार्शी तालुक्यातील एका उद्योजकाचाही समावेश आहे.

अभिजीत अरुण कापसे (वय ३०, रा. जोतिबाची वाडी, ता. बार्शी) यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार याबाबत गुन्ह्याची नोंद झाली आहे. यात ताई दत्ता काळे व अमोल तांबे (रा. सोलापूर) आणि अनिल बाबूराव डिसले (रा. जोतिबाची वाडी, ता. बार्शी) यांची नावे आरोपी म्हणून समोर आली आहेत.

आणखी वाचा-सांगोला पोलीस ठाण्यात जुगाराच्या जप्त रकमेचा अपहार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक, बार्शीतील बंद असलेल्या आदित्यराज साखर कारखान्याचे प्रमुख अरुण सुबराव कापसे यांच्याबाबत हे प्रकरण घडले आहे. कापसे पिता-पुत्र २८ ऑगस्ट रोजी सोलापुरात कामानिमित्त आले असता एका महिलेने त्यांची मदतीसाठी भेट घेतली होती. काही दिवसांनंतर तिने भ्रमणध्वनीद्वारे कापसे यांच्याशी संपर्क करत तुमच्याविरुद्ध महिला अत्याचाराची तक्रार असल्याचे सांगत धमकावण्यास, तसेच खंडणी मागण्यास सुरुवात केली.

दरम्यान, यातून एक लाख लुटल्यावर आणखी १५ लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. अखेर याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून, कापसे यांनी संबंधित महिला आणि तिचा साथीदारासह त्यांचे राजकीय विरोधक अनिल डिसले यांचाही हात असल्याचे सांगून त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.