सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती ते धोत्री गावाच्या रस्त्यावर एका डंपर वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीवरील तिघा बांधकाम मजुरांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

नितीन शाम वाघमारे (वय ३५), देवीदास मारुती दुपारगुडे (वय ३३) आणि हणमंत गोपीनाथ पवार (वय ४३, तिघेही रा. मुस्ती) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्देवी तिघा बांधकाम मजुरांची नावे आहेत. दररोज मजुरीची कामे करून तिघेही तरुण आपल्या घराचा उदरनिर्वाह चालवत होते. परंतु, अचानकपणे या अपघातात त्यांना काळाने हिरावून घेतल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा आधार तुटला आहे. हे तिघेही (एमएच १३ डीजे ५४६६) या दुचाकीवर ट्रिपल सिट बसून मुस्ती येथून जवळच असलेल्या धोत्री गावाकडे मजुरीसाठी निघाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलापूर शहराबाहेरील बाह्यवळण असलेल्या या रस्त्यावर दिवसरात्र मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होते. यात अलीकडे पडलेल्या पावसामुळे रस्ताही खराब होऊन अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. सर्कशीप्रमाणे जीव मुठीत घेऊन खड्डे चुकवत वाहनधारकांना प्रवास करावा लागतो. दरम्यान, या अपघाताची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली आहे.