अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने, पुढील तीन दिवस मुंबईसह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. तसेच, पुणे शहरातही तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कमी दाबाचे क्षेत्र आणि वाऱ्यांच्या चक्रीय स्थितीमुळे गुलाबी थंडीच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत हवामानाची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. थंडीच्या वाटेत विघ्नांची मालिकाच उभी ठाकल्याने ती पूर्णपणे गायब होऊन राज्यात ‘हिवाळी पावसाळा’ अवतरला आहे.

राज्यात चार दिवस पावसाचा अंदाज

मुंबईसह कोकण विभागात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी सोमवारी पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील पावसाळी स्थिती ८ जानेवारीपर्यंत कायम राहणार असून, यादरम्यान राज्यात सर्वच विभागांत पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, मागील २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात ९ जानेवारीपर्यंत पावसाळी स्थिती राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. मराठवाडा व विदर्भात ८ जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्या जिल्ह्यात कधी पाऊस पडणार –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ७ ते ९ जानेवारी या कालावधीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा व सांगली, ७ जानेवारीला सोलापूर, जालना, पालघर तर ८ जानेवारी रोजी नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ८ आणि ९ जानेवारीला मुंबई, ठाणे, रायगड, धुळे, नंदूरबार, जळगाव आदी भागांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.