कराड : जगप्रसिद्ध माथेरान, दार्जिलिंग, सिमला, निलगिरी येथील हिल रेल्वेच्या धर्तीवर सह्याद्री पर्वतरांगांच्या हृदयात, कोयनानगरमध्ये आणखी स्वप्नवत प्रवास आकार घेत आहे. या भागातील पर्यटनाची गाडी अनेक वर्षे थांबली होती. परंतु, राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी ती पुन्हा रुळावर आणण्याचा प्रामाणिक आणि प्रभावीपणे गतिमान प्रयत्न चालवला आहे. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने कोयनेच्या दऱ्यांमधून ‘जॉय मिनी ट्रेन’ लवकरच सुसाट धावणार असून, पर्यटकांना अद्भुत निसर्गाचा अनुभव या जादुई सफरीत मिळणार आहे.
कोयनानगरमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी ही मिनी ट्रेन खास अनुभव ठरणार आहे. मॉडेल रूमपासून सुरू होऊन, नेहरू उद्यानापर्यंतची ही सफर असून, या ट्रेनमधून तिचा सुखद अनुभव घेता येणार आहे. या प्रवासात हिरव्यागार डोंगरदऱ्या, धरणाकाठच्या लहरी, डोंगरकपारीतून दिसणारे अधांग ढग, नानाविध पक्ष्यांचा किलबिलाट हे सारे संस्मरणीय असे अनुभवता येणार आहे. निसर्गाच्या या अदभुत चमत्काराच्या प्रत्येक वळणावर जणू निसर्ग स्वतः बोलतोय आणि आपल्याला स्वप्नवत दुनियेत घेऊन जातोय, असा प्रत्यक्ष अनुभव पर्यटकांना मिळणार आहे.
हा केवळ प्रवास नसून, भावनिक सफर सुद्धा ठरणार आहे.
लहान मुलांसाठी आनंदाचा, मोठ्यांसाठी निसर्गाशी संवाद साधण्याचा आणि स्थानिकांसाठी रोजगाराचे नवे दरवाजे उघडणार हा अनोखा उपक्रम ठरणार आहे. होम स्टे, स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला, मार्गदर्शक सेवा आदींना या प्रकल्पामुळे नवी बाजारपेठ सुद्धा मिळणार आहे. माथेरानच्या धर्तीवर हा उपक्रम सुरू करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई संबंधित व स्थानिक प्रशासनास लगेचच दिले आहेत. या प्रकल्पाचा प्रस्ताव लवकरच तयार करून, आवश्यक परवानग्या, तांत्रिक बाबी, आर्थिक आराखडा या सर्वांचा अभ्यास करून, हा संपूर्ण प्रकल्प साकारणार आहे. यासाठी झालेल्या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, संचालक डॉ. बी. एन. पाटील आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे आदींची या वेळी उपस्थिती होती.
कोयनानगरच्या निसर्गाला या माध्यमातून पर्यटनाच्या नव्या संकल्पनेची जोड मिळाल्याने हा भव्य, दिव्य प्रदेश देशाच्या आणि जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे झळकणार आहे. कोयनेचा निसर्ग, संस्कृती आणि साहस प्रत्येक पर्यटकासाठी सहज अनुभवण्याजोगा होणार आहे. हा प्रकल्प जाहीर होताच त्याचे स्थानिक जनता आणि पर्यटनप्रेमींकडून जोरदार स्वागत होत आहे. हा प्रकल्प कसा असेल याचे चित्र डोळ्यासमोर उभे करताना हा प्रकल्प नेमका कसा साकारेल याकडे लोकांच्या नजरा लागून राहणार आहेत.