सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या मांगेली फणसवाडी येथील निसर्गरम्य धबधबा सध्या वर्षा पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनला आहे. कर्नाटक हद्दीतून धो-धो कोसळणाऱ्या या धबधब्याखाली मनमुराद आनंद लुटण्यासाठी तसेच थंडगार पाण्यात डुबकी मारण्यासाठी रविवाी सिंधुदुर्ग, दोडामार्ग, गोवा, कर्नाटकसह इतर राज्यांमधून शेकडो पर्यटकांनी हजेरी लावली होती.

जवळपास साठ ते सत्तर फूट उंचीवरून खाली पडणाऱ्या या धबधब्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करत आहे. अनेक पर्यटक धबधब्याखाली मनसोक्त आंघोळीचा आनंद लुटत होते, तर काही जण खडकांमधून वाहणाऱ्या नितळ पाण्यात वर्षा पर्यटनाचा आस्वाद घेत होते. पावसाळ्यात हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात.

सुविधांचा अभाव, तरीही स्थानिकांना रोजगार

दुर्दैवाने, हा धबधबा अद्याप पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात आलेला नाही, त्यामुळे येथे कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी पर्यटकांच्या सोयीसाठी चहा, नाश्ता आणि छोटी दुकाने सुरू केली आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी मिळाली असून, त्यांच्यासाठी उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे.

धबधब्याचे नैसर्गिक वैभव

मांगेली फणसवाडी येथील हा धबधबा अनेक वर्षांपासून अविरत कोसळत आहे. गेल्या आठ-दहा वर्षांपासून येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. कर्नाटकच्या सडा माळरानावर आणि दाट जंगलात पडणारे पावसाचे पाणी एकत्र होऊन डोंगरावरून थेट मांगेली फणसवाडी येथे कोसळते. हे पाणी पुढे नदीतून वाहत जाऊन तिलारी धरणाच्या जलाशयात मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मे महिन्यात अवकाळी पावसामुळे हा धबधबा प्रवाहित झाला होता, परंतु पाण्याची पातळी कमी होती. मागच्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतल्याने पर्यटकांचा काहीसा हिरमोड झाला होता. मात्र, शनिवारपासून दमदार पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने नदी-नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत आणि मांगेली फणसवाडी धबधबाही पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्याने पर्यटकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.