सोलापूर : अकलूजमध्ये सयाजीराव वॉटर पार्कमध्ये पाळण्याचा अपघात होऊन त्यात पाळणा तुटून पडल्याने घडलेल्या दुर्घटनेत एका व्यावसायिक पर्यटकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर अन्य दोघे पर्यटक जखमी झाले. दुपारी घडलेल्या या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.तुषार धुमाळ (रा. भिगवण, पुणे) असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकाचे नाव आहे. अन्य दोघा जखमी पर्यटकांवर अकलूजच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची नावे समजली नाहीत.

मृत तुषार धुमाळ हे भिगवण येथील व्यावसायिक होते. उन्हाळ्याची सुट्टी संपली आणि शाळा सुरू झाल्या, तरीही पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी अजूनही पर्यटनस्थळांवर गर्दी कायम आहे. मृत तुषार धुमाळ हे त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांसह अकलूजला सयाजीराव वॉटर पार्कवर जलपर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवेत गोलाकार फिरणाऱ्या एका पाळण्यात बसून पर्यटक आनंदाची लयलूट करीत असताना अचानकपणे पाळणा तुटला आणि खाली कोसळला. यात ही दुर्घटना घडली. या वॉटर पार्कमधील दुर्घटनाग्रस्त पाळण्याची सुरक्षितताविषयक तपासणी दररोज केली जाते किंवा कसे, यासह पुढील तपास अकलूज पोलीस करीत आहेत. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या नातवाच्या नावाने सयाजीराव वॉटर पार्क उभारले आहे.