सातारा : दिवाळीचा सण संपल्यानंतर गावी परतणारे, चाकरमानी तसेच सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांमुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, खंबाटकी घाटात मंगळवारी मोठी वाहतूककोंडी झाली होती. आनेवाडी टोलनाक्यावरही वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. खंबाटकी बोगदा ते पारगावपर्यंत दुपारपासून संथ गतीने वाहतूक सुरू होती. मोठ्या वाहनांमुळे वारंवार वाहतूककोंडी होत असल्याने प्रवासाला अधिक वेळ लागत होता. यामुळे प्रवासी हैराण झाले होते. वाहनांची वाढलेली संख्या आणि त्यातच सततच्या पावसामुळे येणारे अडथळे यामुळे या कोंडीत भर पडत होती.

दिवाळी सणासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव परिसरातील नागरिक कुटुंबासह गावाकडे आले होते. दिवाळी सण संपल्याने पुन्हा उद्योगधंदे व कामावर जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सोमवारपासून दिसून येत आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांची प्रचंड संख्या होती. कोल्हापूर ते पुणे दरम्यान दिवसभर महामार्गावर वाहनांची वर्दळ होती. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

दिवाळीची सुटी संपवून नोकरदारवर्ग शहरांच्या दिशेने माघारी निघाल्याने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गर्दी उसळली आहे. वाई तालुक्यातील वेळेपासून खंबाटकी बोगदा व पुढे खंडाळा जुना टोल नाका परिसरामध्ये वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दरम्यान अनेकजण दिवाळी सण संपल्यावर शाळांना सुट्टी असल्याने पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. या पर्यटकांच्या वाढत्या वाहनांमुळेही या गर्दीत भर पडली आहे.

खंबाटकी बोगद्याचे काम

सातारा, कोल्हापूर, तसेच खंबाटकी बोगदा परिसरात महामार्गाची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी बाह्यवळण दिल्याने वाहनांची गती कमी होत आहे. खंबाटकी बोगद्याचे काम सुरू असल्याने सेवा रस्त्यावरून ही वाहने पारगाव खंडाळ्यापर्यंत येतात. एका वेळी दोनच वाहने जात असल्याने व वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहनांची कोंडी होऊन रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तीन ते चार किलोमीटरच्या टप्प्यात वाहतूक संथ झाली होती.

घाटात गर्दी

खंबाटकी घाटातील दत्त मंदिराजवळील रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूककोंडी होऊन लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी होऊ लागली. या वेळी चारचाकी वाहने, मोठी व अवजड वाहने गरम होऊन रस्त्यातच बंद पडल्याने वाहतूककोंडीत भर पडत होती. तसेच बेशिस्त वाहनचालकांमुळे अवजड वाहनधारकांसाठी अडचणी येत होत्या. खंडाळा पोलीस व महामार्ग पोलीस यांनी आज दिवसभर खंबाटकी घाट आणि बोगदा परिसरात बंदोबस्त ठेवल्याने वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी झाली.

दरम्यान गेले काही सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या वाहतुकीला अडथळे तयार होत होते. रस्त्यावरील खड्डे, नादुरुस्त बाहुवळण रस्ते यामुळेही वाहतूक मंद गतीने धावत आहे. पावसाची रिपरिप, रस्त्यावरील खड्डे यांमुळे वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत होती. गर्दीत व बोगद्याबाहेरील परिसरात वाहतूक सुरळीत करत असताना मध्येच ऊन, मध्येच पाऊस असा दुहेरी सामना करावा लागला.

राज्यपालांनाही फटका

या वाहतूककोंडीचा फटका महाबळेश्वर दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्राच्या राज्यपालांनाही बसला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या ताफ्याला खंबाटकी बोगद्याबाहेरील गर्दीतून मार्ग काढताना कसरत करावी लागली. रस्त्यावर वाहनांची प्रचंड संख्या झाल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूककोंडी झाली होती. दिवसभर वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलीस दलाचे सहायक पोलीस निरीक्षक वंजारी, पोलीस उपनिरीक्षक गोरड व सहकारी, खंडाळा पोलीस ठाणे व भुईंज पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.