सांगली : सराफी दुकानात पोलीस असल्याची बतावणी करून दीड कोटीच्या दागिने व रोकडची लूट करणार्‍या दोन तरूणांना सांगली जिल्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लुटीतील १ किलो ४०० ग्रॅम सोने, तीन किलो चांदीसह १२ लाखाची रोकड सांगली पोलीसांच्या पथकाने जप्त करून दिल्ली पोलीसांच्या ताब्यात दिली.दिल्लीतील फर्शबझार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोला ज्वेलर्समध्ये दि. १५ सप्टेंबर रोजी दोन तरूणांनी पोलीस असल्याची बतावणी करत कामगाराचे अपहरण करत लूट केली होती. दोन तरूणांनी सराफी दुकानातून २० लाखाची रोकड, १ किलो ४०० ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे, तयार दागिने आणि ३ किलो चांदी असा १ कोटी ५६ लाख रूपयांचा ऐवज लंपास केला होता. लूट करून चोरटे सांगली जिल्ह्यात आश्रयाला आल्याची माहिती दिल्ली पोलीसांना तांत्रिक माहितीच्या आधारे मिळाली होती.

दिल्ली पोलीसांचे पथक या दोन तरूणांच्या मागावर सांगलीत आले. दिल्ली पोलीस पथकातील उपनिरीक्षक अमित चौधरी, शशिकांत यादव हे दोघे या तरूणांच्या शोधासाठी सांगलीत आले. सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, उप निरीक्षक कुमार पाटील, संदीप पाटील, अतुल माने, पवन सदामते आदींच्या पथकाने दोघा चोरट्यांचा शोध घेत आरग (ता.मिरज) येथून शुभम वाघमारे व सोनी (ता.मिरज) येथून प्रशांत कदम या दोघांना ताब्यात घेउन चौकशी केली असता त्यांनी दिीतील सराफी दुकानातून पोलीस असल्याची बतावणी करत लूट केल्याची कबुली दिली.

दिल्लीतून लुट केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या दोन तरूणांनी तडक गाव गाठले होते. त्यांनी चोरीत लुटलेले सोने, चांदी व रोकड गावात लपवून ठेवले होते. पोलीसांनी चौकशीत लपविण्यात आलेली लूट हस्तगत केली. लुटीतील रोख २० लाख रूपयापैकी ११ लाख ९१ हजार रूपये पोलीसांना मिळाले. उर्वरित ८ लाख ९ हजार रूपये दोघांनी खर्च केल्याचे निष्पन्न झाले.

या दोघांनाही दिल्ली पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयाने प्रवास कोठडी सुनावली. दोघांनाही जप्त मुद्देमालासह दिल्लीला नेण्यात आले आहे.दरम्यान, कवठेमहांकाळमध्ये प्राप्तीकर अधिकारी असल्याची बतावणी करणार्‍या टोळीपैकी पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून यामध्ये एका तरूणींचा समावेश आहे. या टोळीनेही डॉक्टरांच्या घरावर छापा टाकून सुमारे एक कोटी २० लाख रूपयांचा ऐवज लंपास केला होता. यामध्ये एक किलो सोन्याची बिस्किटे व रोकडचा समावेश होता. या प्रकरणी दिशा भोसले या तरूणीसह पार्थ मोहिते, साई मोहिते, अक्षय लोहार व शकील पटेल या पाच जणांना अटक करण्यात आली असून आणखी दोघेजण फरार आहेत.