शिवछत्रपतींच्या जमिनी विकून कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठीच उदयनराजे भोसले भाजपात गेले आहेत असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. देशभरातील राजे-रजवाड्यांना संस्थानिक जमिनी विकण्याची संमती देण्याचं आमिष दाखवूनच भाजपा त्यांना आपल्याकडे वळवत आहे असाही आरोप नवाब मलिक यांनी केला. महाराष्ट्रात शिवरायांच्या जमिनी विकण्याचा प्रयत्न झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभरात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उदयनराजे भोसले यांच्या पक्षांतराबाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले, “१९९९ च्या आधी उदयनराजे भाजपाचे आमदार आणि मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना हरवलं होतं. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या आईंच्या मध्यस्थीमुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दरवेळी त्यांना तिकीट देत असत. मात्र राष्ट्रवादीमध्ये असूनही ते कायमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातली भूमिका घेत असत. साताऱ्यात पुन्हा एकदा उदयनराजेंचा पराभव करु इतकंच नाही तर सातारा विधानसभेच्याही जागा जिंकू.”

राष्ट्रवादीत असूनही साताऱ्याचा विकास करता आला नाही या उदयनराजेंच्या वक्तव्यावरही नवाब मलिक यांनी सडकून टीका केली. “उदयनराजेंना विकास कळत नाही, त्यांच्यात विचार करण्याची ताकद आहे का? उदयनराजे दिवसा काय करतात ते साताऱ्यातल्या लोकांना माहित आहे ” असा टोलाही मलिक यांनी लगावला. याआधी जितेंद्र आव्हाड यांनीही उदयनराजेंवर टीका केली. शरद पवार यांनी त्यांच्या बालिश चुका पोटात घातल्या तरीही उदयनराजेंनी त्यांची साथ सोडली अशी टीका आव्हाड यांनी केली. तर राजे गेले, सेनापती गेले आता आम्ही मावळे लढणार असं म्हणत काल धनंजय मुंडे यांनी उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली. आता आज नवाब मलिक यांनी मात्र उदयनराजेंवर खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपांना उदयनराजे भोसले काही उत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udayan raje joins bjp because to sale off shivaji maharaj era land property says nawab malik scj
First published on: 14-09-2019 at 21:59 IST