सातारा: सातारा जिल्ह्यामध्ये विजयादशमी चा उत्सव (दि. २) साजरा होत आहे. या निमित्ताने सातारा शहरातील वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने वळवण्यात आलेली आहे सकाळी सातच्या दरम्यान दुर्गा विसर्जन मिरवणुकांच्या निमित्ताने ही वाहतूक कळवण्यात आली आहे .

वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांनी ही माहिती दिली आहे. राजपथ ते मोती चौक यादरम्यान कमानी हौदापासून गोल बागेकडे येणारा रस्ता वाहनांना बंद करण्यात आला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील पथावर शेटे चौक ते शनिवार चौक मार्गे मोती चौकाकडे येणारा रस्ता बंद आहे. स्टेट बँक प्रतापगंज पेठ सातारा डीसीसी बँक मोती तळेपर्यंत येणारे रस्ते वाहनांना बंद करण्यात आले आहेत . विठोबाचा नळ ते जलमंदिर हा रस्ता सुद्धा वाहनांना बंद आहे. मोळाचा ओढा ते बुधवार नाका मार्गावरील शाहूपुरी पोलीस ठाणे ते बुधवार नाका पर्यंत येणारे रस्ते वाहनांना बंद करण्यात आले आहेत .

बोगदा समर्थ मंदिर ते शाहू चौक हा मार्ग हलके वाहन व अवजड वाहनांसाठी बंद राहील . सातारा शहरातून सज्जनगड कास पठाराकडे जाणारी व येणारी सर्व वाहने ही गोडोली नाका शिवराज पेट्रोल पंप खिंडवाडी शेंद्रे सोनगाव फाटा बोगदा मार्गे जातील. कास यवतेश्वर सज्जनगड सोनगाव फाटा मार्गे सातारा शहरात येणाऱ्या वाहनांनी शेंद्रे खिंडवाडी शिवराज पेट्रोल पंप मार्गे सातारा शहरात यावे. बोगदा ते शाहू चौक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.

शाही दसरा साधेपणाने

राज्यातील गंभीर पूरस्थिती लक्षात गेत यंदाचा सातारचा शाही दसऱ्यातील सोहळ्याचा भाग रद्द करून यातून वाचणारा खर्च पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीर केला आहे. तसेच जनतेने पूरग्रस्तांसाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहनही उदयनराजे यांनी केले आहे. साताऱ्याचा शाही दसरा हा राज्यात प्रसिद्ध आहे. या मध्ये मिरवणुकीसह विविध सासंकृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. याचे नियोजन पूर्ण झाले होते. मात्र राज्यावर ओढवलेले पूरसंकट विचारात घेत उदयनराजे यांनी वरील निर्णय जाहीर केला आहे.