छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील आणि देशातील काही भाजपाच्या नेतेमंडळींनी केलेल्या वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यामध्ये खुद्द महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून भाजपाच्या प्रवक्त्यांपर्यंत काही नेत्यांनी ही वादग्रस्त विधानं केली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज साताऱ्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना उदयनराजे भोसले यांनी या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“का कुणास ठाऊक, पण लोकांनी…”

“थोर पुरुषांनी आपलं आयुष्य लोकांसाठी वेचलं. लोकांचं कल्याण व्हावं हाच त्यांचा ध्यास होता. असं असूनही वारंवार त्यांची बदनामी वेगवेगळ्या माध्यमातून केली जात आहे. चित्रपट असेल किंवा जाहीरपणे केली जाणारी वक्तव्यं असतील. का कुणास ठाऊक, पण ही विकृती दिवसेंदिवस वाढतेय. जग वेगाने पुढे जात आहे. लोकांनी फारसा विचार करणं बंद केलंय असं माझं ठाम मत आहे. प्रत्येकाचं जीवन व्यग्र झालंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ विचारांचा विसर पडताना पाहायला मिळत आहे. हे एका दिवसात झालेलं नाही”, असं उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.

“यापुढे शिवरायांचा अपमान कुणी करूनच दाखवावा, काय होईल…”, उदयनराजे भोसलेंनी दिला इशारा!

“..तर देशाचे २९ तुकडे व्हायला वेळ लागणार नाही”

“शिवाजी महाराजांना वाटलं असतं की राजेशाही अस्तित्वात ठेवावी, तर या देशात अजूनही राजेशाहीच असती. त्याकाळी जगात एकमेव शिवाजी महाराज होते की त्यांना वाटलं लोकांचा सहभाग राज्यकारभारात असायला हवा. त्यामुळे इथे लोकशाही अस्तित्वात आली. पण नंतर देशाची फाळणी झाली. आज जर आपण स्वत:ला सावरलं नाही, तर या देशाचे २९ तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रातही विदर्भ, खानदेश, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असे तुकडेही होतील. शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर पडल्यामुळे आपल्याला आजची ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. या परिस्थितीचा विचार मनात आला की दु:ख वाटतं”, अशा शब्दांत उदयनराजे भोसलेंनी खंत व्यक्त केली.

“हे सगळं का घडतंय माहिती नाही, पण…”

“यावरून चाललेल्या राजकारणाला मी फारसं महत्त्व देत नाही. यात राजकारण येऊच शकत नाही. इस्लामिक देशांमध्ये आजही राजेशाही आहेच. आज राजेशाही असती, तर ही वेळ आली नसती. पण शिवाजी महाराजांना वाटलं होतं की लोकांच्या म्हणण्याला महत्त्व असलं पाहिजे”, असं उदयनराजे भोसले म्हणाले. “हे सगळं का घडतंय ते मला माहिती नाही. शिवाजी महाराजांनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपलं कुटुंब म्हणून स्वीकारलं. आज ती भावना कुठे आहे? शिवाजी महाराजांच्या विचारांचा आधार घेऊनच आपण इथपर्यंत आलोय. त्यांच्याविषयीची आस्था कृतीतून दिसून आली पाहिजे”, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udayanraje bhosle angry on bhagatsingh koshyari comment shivaji maharaj pmw
First published on: 15-12-2022 at 13:00 IST