udayanraje bhosale warns serious consequences for demeaning shivaji maharaj | Loksatta

“यापुढे शिवरायांचा अपमान कुणी करूनच दाखवावा, काय होईल…”, उदयनराजे भोसलेंनी दिला इशारा!

उदयनराजे म्हणतात, “राज्याचं सर्वोच्च पद राज्यपाल आहे. त्यांनीच अपमान केला असेल, तर त्यांना…!”

“यापुढे शिवरायांचा अपमान कुणी करूनच दाखवावा, काय होईल…”, उदयनराजे भोसलेंनी दिला इशारा!
उदयनराजे भोसलेंचं राज्यपालांवर टीकास्र (फोटो – एएनआय)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा अशा नेतेमंडळींनी सातत्याने शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानांवरून राजकारण तापलं आहे. या विधानांवरून मोठा वाद निर्माण झाला असून सर्वच स्तरांतून त्याचा निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमवीर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज रायगडावर ‘निर्धार शिवसन्मानाचा’ या नावाने कार्यक्रम घेऊन राज्यपाल आणि भाजपावर परखड शब्दांत टीकास्र सोडलं. तसेच, शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधानं करणाऱ्यांना गंभीर इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पुढचा मोर्चा आझाद मैदानावर!

आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी महाराष्ट्र दौरा काढण्याचा मानस असल्याचंही उदयनराजे भोसले यांनी बोलून दाखवलं. यावेळी बोलताना त्यांनी राज्यपालांवर हकालपट्टीच्या मागणीसोबतच भविष्यात कुणीही शिवछत्रपतींचा अपमान करू नये, असा सज्जड दम भरला आहे.

“शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे”, म्हणत रायगडावरून उदयनराजे भोसलेंची मोठी घोषणा; म्हणाले, “आझाद मैदानात…!”

“आपण काय मिळवलं?”

“ज्यांनी आपलं आयुष्य आपल्यासाठी ज्या युगपुरुषानं वेचलं, आज त्यांचाच अवमान या देशात होतोय. महाराष्ट्रात होतोय. आपण सर्वजण गप्प बसणार आहोत का? त्यांच्या विचारांचा विसर पडल्यामुळे काय घडलं? मागे वळून पाहा. सर्वधर्मसमभाव याचा विसर पडला, त्या त्या वेळच्या राज्यकर्त्यांना विसर पडला, तेव्हा या देशाचं विभाजन झालं. फाळणी झाली. या देशाचे तीन तुकडे झाले. या फाळणीमध्ये अनेक लोकांना वेदना सहन कराव्या लागल्या. जवळचे नातेवाईक मृत्यूमुखी पडले. आपण काय मिळवलं?” असा सवाल उदयनराजे भोसलेंनी केला आहे.

“…तर राज्यपालांचा टकमक टोकावरून कडेलोट…”, उदयनराजे भोसलेंनी मांडली आक्रमक भूमिका; रायगडावरून भाजपावरही टीकास्र!

“अनेक महापुरुषांची खिल्ली उडवली गेली. अवमान केला गेला आणि आपण पाहात बसलो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे आपल्या सगळ्यांचा अपमान आहे असं आपल्याला वाटत नाही का? आपण काही करणार आहोत की नाही? या राजकारणाच्या तावडीत तुम्ही किती दिवस राहणार आहात?” असंही ते म्हणाले.

“यात कोणतंही राजकारण येऊ देऊ नका”

“लवकरच एक तारीख ठरवून मुंबईतल्या आझाद मैदानात जायचंय. आजचा दिवस इतिहासात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. कारण आज आपण आपल्या सगळ्यांची अस्मिता असणाऱ्या शिवाजी महाराजांचा सन्मान राखण्यासाठी एक निर्धार केला आहे. आज आपण सगळे इतिहासाचा भाग झालो आहोत. कुठल्याही प्रकारे यात राजकारण येऊ देऊ नका. यामागे कुणाचाच स्वार्थ नाही. शिवाजी महाराजांचा अवमान यापुढे कुणी करूनच दाखवावा. काय होईल, ते आपल्या परीने आपण बघूनच घेऊ”, अशा शब्दांत उदयनराजे भोसलेंनी इशारा दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 16:11 IST
Next Story
विश्लेषण: ऊस उत्पादकांसाठी ‘एफआरपी’ बदलाचा निर्णय किती परिणामकारक ठरेल? राजकीय पडसाद काय?