Uddhav Thackeray On Pm Modi : शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील दादरच्या एका कार्यक्रमात बोलताना देशातील आणि राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. देशाच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींवरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कबुतरं, कुत्रे आणि हत्तीणीसाठी लोक रस्त्यावर उतरतात. मात्र, हीच माणुसकी जेव्हा पहलगाममध्ये लोक मारले गेले तेव्हा कुठे गेली होती, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला. तसेच पाकबरोबर आता भारताची टीम क्रिकेट खेळणार आहे, मग सिंदूर कुठे गेला? गरम सिंदूरचं आता कोल्ड्रिंक्स झालं का? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“प्रत्येक प्रश्नावेळी डोक्यावर बर्फ आहे, काय करू? तसं थंडपणा आपल्याला परवडणारा नाही. माझी उंची हिमालयाची असली तरी जिगर सह्याद्रीची आहे. आपण सध्या शिक्षणाच्या दर्जावर लक्ष देण्याऐवजी आज हिंदीच्या सक्तीवर लक्ष का देत आहोत? शिक्षणाचा दर्जा आपण का उंचावत नाहीत? आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही. मात्र, सक्ती कशासाठी पाहिजे? काही दिवसांपूर्वी मी दिल्लीत गेलो होतो, तेथेही हा प्रश्न मला अपेक्षित होता. तिथेही मी सांगितलं की आम्ही हिंदीला विरोध करत नाहीत, तर फक्त सक्तीला विरोध करत आहोत. आता माझ्या पेक्षा आपले पंतप्रधान चांगलं हिंदी बोलतात. मग ते कोणत्या शाळेत शिकले? त्यांनाही पहिलीपासून हिंदी सक्ती होती का? मग तरीही त्यांना आश्वासनं देण्यापुरती का होईना हिंदी येती ना”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

“पंतप्रधान मोदी हे काल बिहारमध्ये गेले होते. तेव्हा ते म्हणाले की विरोधक हे घुसखोरांना आणि भ्रष्टाचारांना संरक्षण देण्यासाठी किंवा त्यांचा बचाव करण्यासाठी पुढे आले आहेत. मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये येता तेव्हा तुमच्या आजूबाजूला जो दंभ मेळा असतो, कुंभमेळा वेगळा, हा दंभ मेळा आहे. ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले. ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप कोणी केला? आदर्श घोटाळ्याचा आरोप कोणी केला? त्यानंतर दुसऱ्या दिवशी अशोक चव्हाण लगेच तिकडे गेले. मग तुम्हीच सांगा कोण कोणाचं संरक्षण करतंय?”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

“शेख हसीना यांना तुम्ही आश्रय दिला, आम्ही नाही. बांगलादेशींना विरोध करता आणि बांगलादेशातून पळून आलेल्या माजी पंतप्रधानांना तुम्ही आश्रय देता? भ्रष्टाचाऱ्यांना उपमुख्यमंत्री पद, किंवा आणखी काही पदे देता. खरं तर मला यांची किव येते. आता आपल्याकडे कबुतरांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरतात, चांगली गोष्ट आहे. कुत्र्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरतात, चांगली गोष्ट आहे. हत्तीणीसाठी लोक रस्त्यावर उतरतात, चांगली गोष्ट आहे. माणुसकी पाहिजे, पण ही माणुसकी जेव्हा पहलगाममध्ये आपले काही लोक मारले गेले, ज्या माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला, तेव्हा माणुसकी कुठे जाते?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

“अजून दोन ते तीन महिने झाले नाहीत, आपले संरक्षणमंत्री म्हणाले होते की अजून सिंदूर ऑपरेशन थांबलेलं नाही. आपले पंतप्रधान मोदी म्हणाले की रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. आनंदाची गोष्ट आहे. मेरी रगों रगों में खून नहीं गर्म सिंदूर बह रहा है, मग त्या गरम सिंदूरचं आता कोल्ड्रिंक्स झालं का? तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देता? आपल्या देशाची टीम पाकिस्तानबरोबर आता क्रिकेट खेळणार, मग तुमचा गरम सिंदूर कुठे गेला? तुम्ही घराघरात सिंदूर वाटला ना, मग तो सिंदूर कुठे गेला? कशाला या भाकडकथा करता?”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.