महाराष्ट्रात पावसानं सुरुवातीच्या हजेरीनंतर ओढ दिल्यामुळे शेतकरी हवालदील झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या अहमदनगरमधील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी काही स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा केली. या स्थानिकांनी आपली व्यथा उद्धव ठाकरेंसमोर मांडली. यावेळी एका शेतकऱ्याच्या मुलानं उद्धव ठाकरेंना शिदोरी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्याच्याशी संवाद साधला.

नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरे अहमगनगरमधील काकडी गावातील शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. “या पावसात पीक येऊ शकत नाही. कितीही पाऊस होऊ द्या. शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. याच गावात शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमावर एवढा खर्च झाला. पण आमचे साडेसात कोटी रुपये द्यायला या सरकारला मिळालं नाही”, अशा शब्दांत या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे आपली व्यथा मांडली.

सरकार दारी येऊन काय फायदा झाला?

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी यावेळी शेतकऱ्यांकडे काही मुद्देही उपस्थित केले. “पीकविम्याचे पंचनामे सुरू झालेले नाहीयेत. सरकार तुमच्या दारी आलं की नाही? सरकार तुमच्या दारी कार्यक्रमातून तुम्हाला काही फायदा झाला का? मधल्या अतीवृष्टीची नुकसानभरपाई अजून मिळालेली नाही. आता दुष्काळाची कधी मिळणार? सरकारनं दारात येऊन केलं काय?” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी या शेतकऱ्यांना केली. तेव्हा शेतकऱ्यांनी परिस्थिती वाईट असल्याची व्यथा मांडली.

चिमुकल्याची शिदोरी, उद्धव ठाकरेंची विचारपूस

दरम्यान, हे सगळं घडत असताना तिथे एका शेतकऱ्याचा लहान मुलगा आला. त्यानं उद्धव ठाकरेंच्या हातात कापडात बांधलेली शिदोरी दिली. यात लोणचं, भाकर व ठेचा असल्याचं या मुलानं सांगितलं. तेव्हा “अरे बाळा, तू माझ्यासाठी शिदोरी आणलीस, पण तू काही खाल्लंस का? तू जेवलास का? की स्वत: न जेवता मला शिदोरी देतोयस? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी या मुलाला केली. यावर आपण जेवल्याचं त्यानं सांगितलं. “मी हे घेऊन जातो, मी खाईन हे”, असं म्हणून उद्धव ठाकरेंनी ती शिदोरी ठेवून घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Video: “माझ्या कार्यकर्त्यांकडून तशी प्रतिक्रिया येणं स्वाभाविकच”, ‘त्या’ घटनेवर विखे-पाटलांची भूमिका

“मला बोलायला शब्द नाहीत”

दरम्यान, यांदर्भात माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “हे प्रेम आहे त्यांचं. हीच आमची शिदोरी आहे. हेच आमचे आशीर्वाद आहेत. मला बोलण्यासाठी शब्द नाहीयेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.