Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारने दिली पाहिजे अशी मागणी या दौऱ्यात ते करत आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याची ऑडिओ क्लिप शेतकऱ्यांना ऐकवली आहे. ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, कोरा कोरा…’, असं फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधी एका भाषणात दिलेल्या आश्वासनांवरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“नेहमी प्रमाणे मी आज जाहीर सभा घ्यायला आलेलो नाही. तसेच या ठिकाणी मी मते मागण्यासाठी देखील आलेलो नाही. फक्त तुम्हाला हिम्मत द्यायला आलेलो आहे. शेतकऱ्यांना कोणी काय मदत केली किंवा नाही केली, पण माझ्या हातात जे काही अधिकार आहेत, त्या अधिकाराचा उपयोग जनतेच्या हितासाठी मी करतो. तुमच्या आशीर्वादाने मी कर्जमाफी केली होती. पण आज परिस्थिती अशी आहे की संकट आल्यानंतर सर्वजण फोटो काढायला येतात. फोटो काढून मदतीचं कार्य करतात”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली.
“मी सध्या मराठवाड्यातील विविध भागात फिरतोय तर मला सगळीकडच्या शेतकऱ्यांकडून बोलावलं जातंय, आमच्याकडे या. आम्हाला देखील काही मदत मिळालेली नाही. मग सरकारचे पैसे नेमकं कुठे जात आहेत? मुंबई महापालिका तर त्यांनी लुटून खाऊन टाकली. अदानींच्या सिमेंटच्या पोत्याला कधी हमीभावापेक्षा कमी दर मिळतो का? नाही, मग यांचे सर्व बगलबच्चे पैसे कमवून आरामात राहत आहेत. मात्र, दुसरीकडे उन्हात, पावसात, थंडीत शेतकरी कष्ट करतो. मग शेतकऱ्यांच्या पीकाला योग्य दर मिळतो का?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
“शेतकऱ्यांच्या पीकाला योग्य दर किंवा हमीभाव मिळाला तर कर्ज फेडण्याची चिंता लागेल का? आता पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या जमीनीची माती खरडून गेली, त्या जमीनीचं काय करायचं? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. काही दिवसांपूर्वी माझ्यावर टीका झाली की तुम्हाला शेतकऱ्यांबाबत काय कळतं? ठिक आहे, नाही कळत, पण मी शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहू शकतो. तुम्हाला जास्त कळत असेल तर तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून दाखवा”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघात केला.
उद्धव ठाकरेंनी ऐकवली फडणवीसांच्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप
उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते विविध ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. याचवेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत दिलेल्या त्यांच्या आश्वासनाच्या भाषणाची ऑडिओ क्लिप शेतकऱ्यांना ऐकून दाखवली आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे म्हणत आहेत की, “आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा सातबारा करूयात कोरा, कोरा कोरा…”, असं देवेंद्र फडणवीस त्यामध्ये म्हणत आहेl.
