Uddhav Thackeray Returned from Delhi : “मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी ३ दिवस दिल्लीत मुक्काम करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना हुजरेगिरी करूनही हाती कोरडे चिपाडच लागले. तीन दिवस बैठका, भेटी घेऊनही रिकामे हात हलवत परत यावे लागले आहे”, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी (९ ऑगस्ट) उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. “उबाठा गटाच्या दिल्ली वारीतून महाराष्ट्राच्या वाट्याला तर सोडाच पण उबाठाच्या हातीही धुपाटणेच आले” अशी कोपरखळी उपाध्ये यांनी मारली.

केशव उपाध्ये म्हणाले, महाविकास आघाडीच्या बैठका म्हणजे निव्वळ कोरडे चिपाड आहेत, ना चव… ना रस… ना गोडवा… मुख्यमंत्रिपदाच्या महत्वाकांक्षेपायी उद्धव ठाकरेंनी दिल्लीचे उंबरे झिजवले. पण काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय हा निवडणुकीनंतर होणार असून ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे सांगून उद्धव ठाकरे यांची निराशा केली आहे. जागावाटपातही कॉंग्रेस मोठा भाऊ असणार असा स्पष्ट संदेश दिल्लीवारीतून उद्धव ठाकरे यांना कॉंग्रेसने दिल्याने उबाठा सेनेने स्वाभिमान गमावला आहे.

विधानसभेसाठी जास्त जागा लढवता याव्यात यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवारी केली मात्र त्याही बाबतीत निराशाच पदरी पडणार आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या अमित शाहांची तुलना अहमदशाह अब्दालीशी केली, तेच अमित शाहा भाजपाचे अध्यक्ष असतानाही चर्चेसाठी मातोश्रीवर आले होते. २०१९ मध्ये भाजपाने तुमचा सन्मान राखत तुम्हाला १२५ जागा दिल्या होत्या. आता तुम्हाला १०० जागा मिळवण्यासाठी काँग्रेसच्या दिल्ली तख्तापुढे झुकावे लागतं आहे. जागावाटपात १०० जागाही तुम्हाला मिळणार नाहीत, मग तुमच्या दिल्ली दौऱ्यातून नेमकं पदरी तरी काय पडलं? असा खोचक सवाल उपाध्ये यांनी केला.

हे ही वाचा >> Manoj Jarange : बदनामीसाठी बोलायला लावणारे एकमेव ठिकाण सागर बंगला, मनोज जरांगे यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ठाकरे मराठा आरक्षणप्रश्नी दिल्लीत चर्चा करतील अशी अपेक्षा होती, मात्र…”

भाजपा प्रवक्ते म्हणाले, महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार प्रामाणिक प्रयत्न करत असताना उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन मविआच्या घटक पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून आरक्षणाबाबत काही ठोस भूमिका घेतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. ती देखील धुळीस मिळाली आहे. ठाकरे हे केवळ स्वत:च्या राजकीय हव्यासापोटी दिल्लीला गेले होते. त्यांना महाराष्ट्राच्या व राज्यातील जनतेच्या हिताशी काहीही देणेघेणे नाही.