Uddhav Thackeray राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करु नये अशी मागणी विरोधकांकडून गेल्या काही दिवसांपासून होत होती. सातत्याने यासाठी विरोधक आक्रमक झाले होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मोर्चा काढायचा निर्णयही घेतला होता. दरम्यान १६ एप्रिल आणि १७ जूनचे त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय रद्द केल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ज्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली आहे. मराठी माणसाच्या सक्तीसमोर सरकारची सक्ती हरल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मराठी माणसाच्या सक्तीसमोर सरकारची सक्ती हरली आहे. मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या सक्तीला हरवू शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळीही अशीच चळवळ झाली होती. त्यावेळीही डाव उधळला होता, आजही डाव उधळला आहे. मला एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की आपल्या राज्यात जे सरकार आहे हा प्रयत्न केला की मराठी माणसांची एकजूट तोडायची. मराठी-अमराठी वाद घडवून आणायचा असं ठरवलं होतं. मात्र मराठी माणसाने समंजस विरोध केला की आमचा सक्तीला विरोध आहे भाषेला नाही. त्यामुळे मराठी आणि अमराठी अशी फूट पडली नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपा म्हणजे अफवांची फॅक्टरी
आंदोलन केल्यानंतर त्यांना वाटलं नसेल की मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून हा जीआर रद्द केला. हा जीआर कुणी काढला होता? हरिश्चंद्राची फॅक्टरी असा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता. तसं भाजपा म्हणजे अफवांची फॅक्टरी झाली आहे. अफवा पसरवायच्या, विरोधकांची बदनामी करायची आणि खोट्या मार्गाने विजय मिळवायचा हा भाजपाचा धंदा आहे, त्या धंद्याला मराठी माणसाने चोख उत्तर दिलं आहे. माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एक संकट समोर येईपर्यंत वाट कशाला बघायची. ५ जुलैला आम्ही सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो. पण ५ जुलैला विजयी मोर्चा किंवा सभा असं असेल. मी परत एकदा सांगतो की आंदोलनाच्या निमित्ताने एकवटलेल्या सगळ्या पक्षांना विनंती करतो आहे की सक्ती आपण मागे घ्यायला लावली आहे. मात्र ५ तारखेला एकत्र येऊ, सगळ्यांशी बोलून त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल ही विनंती मी करतो आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
भाजपाकडून खोटं पसरवलं जातं आहे-उद्धव ठाकरे
राष्ट्रीय शिक्षण धोरण आल्यानंतर आम्ही माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर एक अभ्यासगट नेमला. पण त्या अभ्यासगटाची एकही बैठक झाली नाही. मात्र नंतर सरकार पडलं. त्यामुळे भाजपाकडून खोटं पसरवलं जात आहे. असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.