scorecardresearch

“पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर…”; जाहीर भाषणात उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार, असा सवाल करीत भाजपाचा डोळा आता मुंबईतील सत्तेवर असल्याचंही ते म्हणाले.

“पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर…”; जाहीर भाषणात उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
मुंबईमधील कार्यक्रमात बोलताना केली टीका

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१९ साली नोव्हेंबर महिन्यामध्ये भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरुन भाजपाला टोला लगावला आहे. ‘मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन’चा सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात बोलताना उद्धव यांनी भाजपावर टीकास्त्र सोडत पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ दिला. केवळ सत्तेसाठी भाजपा वाटेल ते करते असं सांगताना त्यांनी या पहाटच्या शपथविधीची तुलना स्वत: शिवतीर्थावर घेतलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथेशी केली.

गुरुवारी या कार्यक्रमामध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी, “अनेक मुलं अशी आहेत ज्यांच्यासाठी आपल्या देशात पोषक वातावरण पाहिजे. पण बाकीच्या राजकारण्यांचं म्हणजे सत्ता पिपासू राजकारण्याचं कसं असतं तर लोक मेले तरी चालतील, बेकार राहिले तरी चालतील पण सत्ता आपल्याकडे पाहिजे
कशासाठी पाहिजे सत्ता?” असा सवाल उपस्थित केला. पुढे उद्धव यांनी, “शिवसेनाप्रमुख सांगायचे की कोंबडी अंड्यावर बसली तर त्यातून पिल्लू तरी निघतं. हे खुर्च्या उबवत राहिले तर त्यातून काहीच निघत नाही. सत्ता पाहिजे तर घ्या ना सत्ता पण ती कशासाठी पाहिजे?” असंही उद्धव म्हणाले.

“आपण काही केलं तर लोकशाहीचा विरोध, लोकशाहीचा खून म्हणणार. मी यापूर्वीही बोललो आहे की आपण जी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सोयरीक जुळवली त्यासाठी कोणी भाग पाडलं? मी सगळा इतिहास नाही सांगत बसणार. मला ठाऊक आहे की मी तुमच्या चांगल्या कार्यक्रमात व्यत्यय आणलेला आहे. बऱ्याच दिवसांनी तुम्ही कार्यक्रम बघायला आलात आणि मध्येच माझं भाषण सुरु झालं. तुम्ही म्हणाल काय होतं ते बरं होतं,” असं म्हणत उद्धव यांनी मोजक्या शब्दांमध्ये आपलं भाषण आटोपतं घेतलं. पण त्यांनी जाता जाता भाजपाला पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन दिली.

“आम्ही ती सोयरीक अधिकृत जुळवली, चोरुन मारुन पहाटेचा शपथविधी नव्हता केला. तो शपथविधी यशस्वी झाला असता तर ते सुद्धा ओके होतं. पण केवळ आपल्यासोबत बसले तर नाही नाही हे केवढं मोठं पाप आहे, अशी त्यांची भूमिका आहे. आमच्याकडे शिंपडलं तर काय गंगाजल आहे आणि तुम्ही जर शिंपडलं तर ते गटाराचं पाणी आहे, असं झालं हे,” असा टोला उद्धव यांनी लगावला.

“आम्ही काय वाटेल ते करु पण तुम्ही नाही करायचं. आम्ही वाटेल ते करतच नाही. आम्ही जे करतो ते जनतेच्या समोर करतो, त्यांच्या साक्षीने करतो.
म्हणूनच मी शपथविधीचा कार्यक्रम शिवतिर्थावर केला. सर्वांसमोर शपथ घेतली. चोरुन नाही,” असंही उद्धव म्हणाले.

राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपाकडून दुसऱ्या पक्षांचे आमदार, खासदार, नेते चोरण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू झाला आहे. हा राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार, असा सवाल करत भाजपाचा डोळा आता मुंबईतील सत्तेवर असून मुंबईतील मराठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा असून तो डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वासही उद्धव यांनी व्यक्त केला. आचारविचार काहीही नसलेल्या भाजपाला सत्तापिपासूप्रमाणे मुंबई मिळवण्याची हाव लागली आहे. मात्र, मराठी माणूस ती कदापि पूर्ण होऊ देणार नाही, असं उद्धव म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना कंत्राटी कामगारांप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्रीदेखील कंत्राटी आहेत. त्या पदावर किती वेळ राहणार हे त्यांनाच माहीत नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली. मुंबईत १९६० च्या दशकात काँग्रेस नेते स. का. पाटील यांचा मोठा दरारा होता. त्यांच्याविरोधात कोण उभे राहणार, असा प्रश्न होता. पण, जॉर्ज फर्नाडिस यांनी स. का. पाटील यांचा मोठा पराभव केला. आम्हाला कोणी हरवू शकत नाही असे समजणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे. शेरास सव्वा शेर मिळतोच हे त्यांनी विसरू नये असे ठाकरे यांनी भाजपाला सुनावले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray salms bjp with reference of devendra fadnavis ajit pawar oath taking scsg

ताज्या बातम्या