रत्नागिरी : स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक होत माजी खासदार विनायक राऊत व उपनेते बाळ माने, संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, आणि जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर जनआक्रोश धडक मोर्चा काढला.

या मोर्चाला विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालयापासून सुरुवात करुन महावितरणच्या अधिक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. स्मार्ट प्रीपेड मीटर रद्द झालेच, महावितरणचे खासगीकरण थांबलेच पाहिजेत अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या वेळी शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स सक्ती केली जात असल्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली. सुरुवातीला माजी खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय ते महावितरण कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) मधील शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, शिवसहकार सेना, रिक्षासेना व अंगीकृत सर्व संघटनेती सर्व पदाधिकारी, सर्व उपजिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक व सर्व वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार असे जाहीर करून हे मीटर कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केली आहे. या संबंधातील टेंडर मंजूर करून सर्वत्र मीटर लावण्याची मोहीम सुरू झालेली आहे. वास्तविक हे मीटर मोफत लावले जाणार नाहीत. केंद्र सरकारचे अनुदान वगळता या मीटरचा उर्वरित सर्व खर्च वीजदर निश्चिती याचिकेद्वारे आयोगाकडे मागणी केला जाईल आणि आयोगाच्या आदेशानुसार वीज दरवाढीच्या रुपाने १ एप्रिल २०२५ पासून ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाईल, हे निश्चित व स्पष्ट आहे. त्यामुळे केवळ महावितरण कंपनी वा येणाऱ्या खासगी वितरण कंपन्या वा सरकार यांच्या हितासाठी आणि खाजगीकरणाच्या वाटचालीतील पुढचा टप्पा म्हणनूच ही योजना आणलेली आहे, असे स्पष्ट दिसून येत आहे.