महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याबाबतचा प्रश्न विचारला असता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत उत्तर दिलं आहे. नागपूरमधल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी?
महाराष्ट्रात टोळ्यांचं राज्य आलं आहे का ? अशी भावना आपल्या लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे की ते म्हणजे सगळं चोरायचं. मुंबईत महापालिकेतलं कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपलं कर्तृत्व नसतं तेव्हा पक्ष चोरायचा, वडील चोरायचे हे सगळे प्रकार केले जातात. ज्यांच्यात कुवत नसते, स्वतः काही निर्माण करण्याची ताकद नसते ते सरळ सरळ ताबा घेतात. त्यामुळे हा थोडासा मानसोपचार तज्ज्ञांकडे दाखवण्याचा विषय आहे. अशा लोकांना स्वतःच्या सुमार बुद्धीची जाणीव असते. त्यामुळे ते असे प्रकार करत राहतात. त्यांच्या न्यूनगंडाचं रूपांतर अहंगडात करतात आणि मग दुसऱ्यांचे नेते चोरायचे, पक्ष चोरायचे, ऑफिस बळकवायचं असे प्रकार केले जातात असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर टीका केली.

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आज मला वाटतं ते आरएसएस कार्यालयात ते गेले होते. माझी मोहन भागवत यांना विनंती आहे की जरा तुमचं कार्यालय तपासून पाहा कुठे काही लिंबं वगैरे टाकलेली नाहीत ना? यांची (एकनाथ शिंदे) बुभुक्षित नजर कशी आहे याचा अनुभव आम्ही घतला आहे. जे काही चांगलं आहे ते आपण मिळवायचं नाही. मग जे दुसऱ्याचं आहे त्याच्यावर नजर ठेवायची, त्यानंतर ताबा घ्यायचा ही त्यांची वृत्ती आहे. आरएसएसनेही या असल्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही त्यांना रस्त्यावर आणलं, त्यानंतर पायऱ्यांवर आणलं. याबाबत विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले ज्यांचं स्वतःचं काही कर्तृत्व नाही, ज्यांची कुवत नाही तेच असलं काहीतरी करतात. सगळं आपलं आहे म्हणून दावा सांगतात किंवा कब्जा करतात. मग पक्ष चोरायचा, वडील चोरायचे असे प्रकार होतात असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

कर्नाटकच्या ठऱावाबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?
ठराव हा महाराष्ट्राच्या वतीने आहे. आम्हाला जे सुचवायचे ते सुचवले. महाराष्ट्रासाठी आम्ही ठरावाला पाठिंबा दिला. ही प्रकरणे बाहेर कुठून येताहेत हा त्यांनी विचार करावा. माझा त्यावेळेला पण माझा पाठिंबा नव्हता तेव्हा आरोप झाले मी त्या मंत्र्याला काढले हे तुम्हाला माहिती आहे. महापुरुषांचा अपमान करणारी व्यक्ती संवैधानिक पदावर कशी असू शकते. अमित शहांनी राज्यपालांच्या पत्राला काय उत्तर दिले ते कळले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिन्ही ठिकाणी भाजपची सरकार आहेत. जर कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकणे बोलतात. हा भाजपाचा डाव आहे. मुंबई ताब्यात आम्ही घेऊ देणार नाही. विदर्भाचा वेगळे होण्याचा मुद्दा हा विकासाशी संबंधित आहे. मी पत्रकार परिषद सुरु करतांनाच विदर्भाला काय देणार इथूनच सुरुवात केली. मी मुख्यमंत्री असतांना मिहानला, गोसीखुर्दला गेलो. यांच्या काळात उद्योग पळाले. मी शिवसेनाप्रमुखांचेच स्वप्न पूर्ण करत होतो.