आज उद्धव ठाकरे यांची अधिवेशनात उपस्थिती होती. आज त्यांनी पेन्शनच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली आहेच. त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांचा मुद्दा उपस्थित करत सरकारला टोला लगावला आहे. नवबा मलिक सभागृहात सत्ताधारी बाकांवर बसल्याने गदारोळ झाला होता. तसंच प्रफुल्ल पटेलांनी इक्बाल मिर्चीशी व्यवहार केले त्याबद्दल भाजपा काहीच का बोलत नाही? असाही प्रश्न उपस्थित झाला. यावरुन आणि छगन भुजबळांवरुन आज उद्धव ठाकरेंनी भाजपाला आणि सरकारला टोला लगावला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“आम्ही आता छगन भुजबळांकडे पेढे खायला जाणार आहोत. कारण त्यांची चौकशी बंद करण्यात आली. त्यांना काही वर्षे तुरुंगात ठेवल्यानंतर जेव्हा जामीन मिळाला तेव्हाही धमक्या दिल्या जात होत्या की जामिनावर आहात विसरु नका. आता नेमकं असं काय घडलं? की त्यांची चौकशी बंद झाली? छगन भुजबळ यांच्याकडे आम्ही आता पेढे खायला जाणार आहोत.”
छगन भुजबळांना कुठला साधूबाबा आणि जडीबुटी मिळाली की त्यांच्यावरची चौकशीच बंद करण्यात आली? ही जडीबुटी देवा सगळ्यांना दे अशी माझी प्रार्थना आहे. हे सरळ सरळ थोतांड आहे. ते म्हणजे हिंदुत्व नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी काय टोला लगावला?
आपल्या संवादात उद्धव ठाकरेंनी प्रफुल्ल पटेल यांच्यावरुनही टोला लगावला, “छगन भुजबळांकडे जाऊन पेढे खाल्ले की नंतर माझा विचार असा आहे की संसदेचं अधिवेशन संपलं की प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मी जेवायला जाणार आहे. पण त्यांना विनंती करणार आहे की ‘मिरची कम’ जेवण द्या.”
प्रफुल्ल पटेलांकडे आता जेवायला जायला काही हरकत नाही कारण त्यांना राजमान्यता मिळाली आहे. छगन भुजबळांनाही राजमान्यता मिळाली आहे. प्रफुल्ल पटेलांकडे मिरची कम जेवायला काय हरकत आहे?
मुंबईच्या ऑडिटवर म्हणाले उद्धव ठाकरे ?
मुंबई महापालिकेचं ऑडिट जरुर करा. नागपूर बुडवणाऱ्या विकास पुरुषांचीही चौकशी करा. नागपूर बुडत असताना जे बॉलिवूड तारकांसह फोटो काढत मुख्यमंत्री मग्न होते. ठाण्याची चौकशी करा, नागपूरची करा. करोना काळात पीएम केअर फंडाचं काय झालं? त्याचीही चौकशी करा असं आमचं जाहीर आवाहन आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आमच्यावर कुठलाही दबाव असण्याचं कारण नाही. खोटे आरोप करणार असाल तर आम्ही खरी माहिती समोर आणू. ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट्स आहेत, आम्ही ते पण बाहेर आणू असाही इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
प्रभू श्रीराम ही काही कुठल्याही पक्षाची मक्तेदारी नाही. बाबरी पाडण्यात यांचा सहभाग नव्हता. मुंबई हिंसाचारापासून वाचवण्यात कुठे यांचा सहभाग नव्हता. जो प्रमुख असतो तो उद्घाटन करतो हे त्यांचं नशीब आहे. मला कुणाचं आमंत्रण हवंय असं नाही. प्रभू रामचंद्रांकडून मला प्रेरणा मिळेल तेव्हा मी अयोध्येला जाईन. असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.