Ujjwal Nikam On Gulshan Kumar Murder Case : ख्यातनाम संगीत दिग्दर्शक, चित्रपट निर्माते व टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांची १२ ऑगस्ट १९९७ रोजी मुंबईत हत्या करण्यात आली होती. ते अंधेरीतील एका मंदिरात पूजा करून बाहेर पडत असताना गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला. या हत्येमागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी अबू सालेम व संगीत दिग्दर्शक नदीम सैफी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलीस चौकशीनंतर अब्दुल रौफ उर्फ रौफ मर्चंट या आरोपीला मुख्य दोषी ठरवण्यात आलं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
दरम्यान, या हत्या प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन, नदीम सैफीचा हत्येतील सहभाग यावर ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शुभांकर मिश्रा या युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत निकम यांना प्रश्न विचारण्यात आले की गुलशन कुमार यांचा खून कशासाठी झाला? त्यांच्या हत्येचा आणि मुंबईतील माफियाचा संबंध काय? नदीम-श्रवण या संगीत दिग्दर्शक जोडगोळीतील नदीम सैफी हा गुलशन कुमार यांच्या हत्येमागचा सूत्रधार होता का? यावर उज्ज्वल निकम म्हणाले, तोच होता ना? तो या हत्येमागे होता, म्हणूनच तर तो न्यायालयीन सुनावणीला हजर राहात नाही.
नदीमला भारतात यायचं आहे, त्याने प्रस्तावही पाठवलेला : उज्ज्वल निकम
निकम म्हणाले, “गुलशन कुमार हत्येप्रकरणी न्यायालयाने अनेक वेळा नदीम सैफी याला हजर राहण्यास समन्स बजावलं आहे. मात्र, तो आजवर कधीच सुनावणीला सामोरा गेला नाही. नदीम आजही बाहेर राहून गाणी तयार करतो आणि भारतात प्रदर्शित करतो हे आम्हाला माहिती आहे. त्याला भारतात परत यायचं आहे. त्याने अनेक वेळा तसा प्रस्ताव पाठवला आहे. परंतु, आम्ही त्याला सांगितलं की तू न्यायालयीन सुनावणीला हजर राहा. तुझा कबुलीजबाब नोंदव. परंतु, त्याला न्यायालयासमोर यायचं नाही.”
अनुराधा पौडवाल व अलका याज्ञिकचा उल्लेख करत म्हणाले…
त्यानंतर निकम यांना विचारण्यात आलं की नेमकं प्रकरण काय होतं? यावर उज्ज्वल निकम म्हणाले,
अनुराधा पौडवाल या संगीत दिग्दर्शकाची गायिका तर अलका याज्ञिक त्या संगीत दिग्दर्शकाची गायिका असा सगळा वाद होता.
गुलशन कुमार यांच्या हत्येमागचा सूत्रधार कोण? या प्रश्नावर उत्तर देताना उज्ज्वल निकम म्हणाले,
पोलीस सांगतात की नदीम हाच गुलशन कुमार यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे. बॉलिवूडमधील हा सगळा प्रकार पूर्वी लोकांना माहिती नव्हता. परंतु, १९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले आणि त्यानंतर सगळे खडबडून जागे झाले.
संजय दत्त प्रकरणाचा उल्लेख करत म्हणाले…
ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले, १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला शिक्षा झाली होती. त्याच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचा आरोप होता. त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर सगळं बॉलिवूड एकत्र आलं, बॉलिवूडने एक मोहीम सुरू केली, ‘बाबा यू आर नॉट गिल्टी’ (संजूबाबा, तू दोषी नाहीस) अशी बॉलिवूडकरांची मोहीम होती. मात्र, मी प्रसारमाध्यमांसमोर आलो आणि म्हणालो की ‘तुम्ही न्यायव्यवस्थेचं चुकीचं चित्रण करण्याचा प्रयत्न करत आहात, मी तुमच्याविरोधात खटला चालवेन.’ त्यानंतर ती मोहीम मागे पडली.