रत्नागिरी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तांवर केंद्र सरकारने कारवाई कायम ठेवली आहे. या कारवाई नुसार रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दाऊदच्या तीन भूखंडांचा लिलाव होणार आहे. खेड तालुक्यातील दाऊद इब्राहिम याच्या तीन भूखंडांचा लिलाव ४ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या लिलावात समाविष्ट असलेल्या मालमत्तांमध्ये सुमारे १७१ चौरस मीटर शेतजमिनीचा एक तुकडा आणि दोन इतर भूखंडांचा समावेश आहे. या सर्व मालमत्ता स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स या केंद्रीय संस्थेने पूर्वीच जप्त केल्या आहेत. या संस्थेच्या मार्फतच मालमत्तेचा लिलाव पार पडणार आहे.
जानेवारी २०२४ मध्ये दाऊद इब्राहिम याच्या खेड तालुक्यातील मुंबके गावातील चार मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता. या मालमत्ता जिथे दाऊद आणि त्याच्या भावंडांनी बालपणाचा काही काळ घालवला होता, त्या ठिकाणी आहेत. या मालमत्तांवर अनेक इच्छुकांनी बोली लावली होती, मात्र काही जमिनींच्या वादांमुळे अंतिम हस्तांतरण प्रक्रियेला उशीर झाला होता.या नव्या लिलावासाठी ऑनलाइन आणि प्रत्यक्ष बोली प्रक्रियेचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या मालमत्ता संपूर्णपणे कायदेशीररित्या जप्त करण्यात आल्या आहेत आणि त्यांचा कोणत्याही प्रकारे गुन्हेगारी व्यवहाराशी संबंध राहिलेला नाही, असे स्पष्टीकरण केन्द्र शासनाने यापूर्वीच केले आहे.
या लिलावाच्या पार्श्वभूमीवर खेडसह जिल्ह्यात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. काही स्थानिक गुंतवणूकदार आणि उद्योगपती या जमिनींबद्दल रस दाखवत आहेत. मुंबके गावात दाऊदच्या पूर्वीच्या मालमत्तांबाबत लोकांमध्ये अजूनही चर्चेचा विषय कायम आहे. दाऊद इब्राहिमविरुद्ध केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये अनेक मालमत्तांची जप्ती आणि लिलाव प्रक्रिया हाती घेतली आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि रत्नागिरी या ठिकाणी त्याच्या नावे किंवा संबंधित व्यक्तींच्या नावे असलेल्या मालमत्तांवर सरकारचा कायदेशीर कब्जा करण्यात आला आहे.