परभणी : प्रखर उन्हाळ्याच्या दिवसात ४४ अंश सेल्सिअसचा पारा तापमानाने ओलांडला होता. मात्र गेल्या काही दिवसातील ढगाळ वातावरणामुळे तापमान कमी झाले आहे. शहरात बुधवारी ३६.९ असे कमाल तापमान नोंदवल्या गेले आहे. गेल्या काही दिवसात तापमानाची ही सर्वाधिक घसरण आहे. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने तापमानाचा पारा अचानक खाली आला आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.

सोमवार, मंगळवार या दोन दिवसात जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. विशेषतः सोमवारी झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली. काही शिवारातील आंब्याच्या झाडांनाही मोठा फटका बसला. तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे सौरपटल वाऱ्याने उडून गेले. दोन दिवसात वातावरण अचानक बदलल्याने पारा कमी झाला. मंगळवारी (दि.६) कमाल तापमान ३८.८ असे नोंदवल्या गेले तर सोमवारी ते ४१.४ एवढे होते. गेल्या आठवड्यात तापमानाने ४४ अंश सेल्सिअस ओलांडून कहर केला होता. आता तापमान घटले असले तरी अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाच्या वतीने ही सर्व माहिती संकलित केली जात आहे.

वीज कोसळून जनावरे दगावली

पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील शेतकरी दिगंबरराव मोरे यांच्या शेत आखाड्यावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास वीज पडून दोन गाई व तीन जनावरे दगावली तर पाच जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. तसेच आखाड्यावरील एक लाख रुपयांच्या खताच्या गोण्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने सालगडी बचावले. मात्र त्यांचे संसार साहित्य जळून खाक झाले आहे. आखाड्यावर लहान-मोठी ३३ जनावरे होती. शेतकरी दिगंबरराव मोरे यांच्या आखाड्यावरील एकूण पाच लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस

शहरात बुधवारी दुपारी दीड ते सव्वादोन वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. शहरातील विविध भागातील रस्त्यांवरून पावसाचे पाणी वाहू लागले होते. अचानक आलेल्या पावसाने पंचाईत झाली. प्रचंड तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणातील पारा कमी झाल्याने तूर्त दिलासा मिळाला.