Puja Khedkar denies charges of forgery: माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. प्रकरण केंद्रात पोहोचल्यानंतर यूपीएससीने कारवाई करत त्यांची उमेदवारी रद्द केली होती. तसेच नाव, फोटो आणि स्वाक्षरी बदलून अनेकवेळा परीक्षा दिल्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला होता. यूपीएससीच्या कारवाईला पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. नुकतेच त्यांनी यूपीएससीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत यूपीएससीला कारवाई करण्याचा अधिकारच नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्याविरोधातील सर्व आरोपही त्यांनी फेटाळून लावले आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात पूजा खेडकर यांनी नमूद केले की, एकदा यूपीएससीने प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून निवड केल्यानंतर त्यांना अपात्र ठरविण्याचा अधिकार उरत नाही. केवळ केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडूनच अखिल भारतीय सेवा कायदा, १९५४ (All India services Act, 1954) आणि प्रोबेशनर नियमानुसारच कारवाई केली जाऊ शकते.

हे वाचा >> पूजा खेडकरप्रमाणे ३५९ उमेदवारांनी बळकावली नोकरी… आता फेरतपासणीत…

यूपीएससीने ३१ जुलै रोजी पूजा खेडकर यांची तात्पुरती उमेदवारी रद्द करून त्यांना भविष्यात यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेस बसण्यास मनाई केली होती. आपल्या पदाचा गैरवापर आणि नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या नियमानुसार वेगवेगळी ओळख धारण करून अनेकदा परीक्षा दिल्याबद्दल त्यांना दोषी मान्यात आले होते. तसेच यूपीएससीने दिल्ली येथे पूजा खेडकर यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता.

Pooja Khedkar Parents
पूजा खेडकर यांच्या पालकांच्या वैवाहित स्थितीची होणार चौकशी (फोटो – इंडियन एक्स्प्रेस)

हे ही वाचा >> Pooja Khedkar Bail Plea: “…म्हणून मला लक्ष्य केलं जात आहे”, पूजा खेडकर यांचा न्यायालयात आक्रमक युक्तिवाद; मांडले ‘हे’ मुद्दे!

यानंतर पूजा खडेकर यांनी या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच यूपीएससीच्या निर्णयालाच आव्हान दिले. यूपीएससीची परीक्षा देताना नावात गडबड केली नसल्याचा दावा पूजा खेडकर यांनी केला आहे. “२०१२ ते २०२२ या काळात मी माझे नाव आणि आडनाव यात कोणताही बदल केलेला नाही. तसेच ही माहिती यूपीएससीच्या तपशीलवार अर्जात नमूद आहे”, असेही त्या म्हणाल्या. तसेच २०१९, २०२१ आणि २०२२ साली व्यक्तीमत्व चाचणी देताना यूपीएससीने बायोमेट्रिक तपासणीद्वारे त्यांच्याशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केलेली होती. तसेच २६ मे २०२२ रोजी प्रत्यक्ष मुलाखतीआधी यूपीएससीने पुन्हा एकदा सर्व कागदपत्रांची तपासणी केली होती.

ताजी अपडेट

पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. अटकेपासून त्यांना अंतरिम दिलासा मिळाला असून आता त्यांना ५ सप्टेंबर पर्यंत अटक करता येणार नाही, असे न्यायालयाने सांगितले आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांच्या अटकेची मागणी केली होती.