नांदेडपाठोपाठ नागपूर व छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात झालेल्या रुग्ण मृत्यू प्रकरणावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. तसंच, त्यांनी शिंदे सरकारवर एक हाफ दोन फुल अशी टीकाही केली. यावरून एकनाथ शिंदेंनीही प्रत्युत्तर दिलं. आता यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी पलटवार केला आहे.
“करोना काळात हीच यंत्रणा होती, हेच डॉक्टर आणि कर्मचारी होते. पण आम्ही परिस्थिती हाताळून घेतली होती”, असं उद्धव ठाकरे आज म्हणाले. त्यावर प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे म्हणाले की, “आम्हीही करोना काळात पीपीई कीट घालून रुग्णालयात मदत करत होतो.” यावर अरविंद सावंत म्हणाले की, “करोना काळात मदत करताना शिवसेनेचे अनेक शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि नगरसेवकांचं निधन झालं. पण, आम्ही मीडिया घेऊन फिरत नव्हतो. फोटो काढत नव्हतो. नशिब ते (एकनाथ शिंदे) भलतीकडे कॅमेरा घेऊन जात नाहीत.”
“करोना काळात मी दोन तीन गोष्टी प्रकर्षाने अनुभवल्या. उद्धव ठाकरेंनी टास्क फोर्स तयार केला. उभ्या देशात कोणी टास्क फोर्स तयार केला नव्हता. लहान मुलांचा प्रश्न आला तेव्हा लहान मुलांसाठीही त्यांनी फोर्स तयार केला. फोकस होऊन त्यांनी काम केलंय. तुम्ही काय सांगता पीपीई किट घालून फिरत होतात”, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.
हेही वाचा >> “एक फुल, एक हाफ” म्हणत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “त्यांचा खरा चेहरा…!”
थ्रीव्हिलवरून एवढी प्रगती कशी झाली?
दरम्यान, करोना काळात मुख्यमंत्री घरात बसून पैसे मोजत होते असा आरोपही उद्धव ठाकरेंवर करण्यात येतोय. त्यावर अरविंद सावंत म्हणाले की, “मी त्यांच्या खालच्या लेव्हलला जाऊ इच्छित नाही. पैसे मोजत होते असं जेव्हा सांगता तेव्हा ते पैसे कोणी दिले हा प्रश्न नाही का पडत? तुमची थ्री व्हिलरमधून एवढी प्रगती झाली, तुम्ही कोणतं झाड लावलंत ते तरी सांगा. ज्या डायरीत तुमचं नाव आहे,त्या डायरीवाल्यांनाही विचारलं पाहिजे यांनी कुठे एवढं वृक्ष लावलं आहे. त्यामुळे या विषयात जाऊया नको. कमरेखाली बोलणं, आई वडिलांच्या बद्दलची प्रतारणा करणं इतक्या खालच्या पातळीची प्रतारणा केली आहे. ते हाफच आहेत, तसेच राहणार”, असंही सावंत म्हणाले.
एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?
“कोविडमध्ये जे तोंडाला मास्क लावून घरात बसून फेसबुक लाईव्ह करत होते, त्यांनी माझ्यासारख्या रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या माणसाला शिकवू नये. मी जेव्हा पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये मदत करत होतो, तेव्हा हे घरात बसले होते. त्यांना भेटायला येणाऱ्यांचीही अँटिजेन टेस्ट करून दोन दोन तास बसवून नंतर भेटत होते. असे मुख्यमंत्री जगाने पाहिले नसतील. त्यामुळे कोविडमध्ये माणसं मरत असताना हे घरात बसून नोटा मोजण्याचं काम करत होते. त्यांचा खरा चेहरा लोकांनी कोविडमध्ये पाहिलाय”, असा आरोप एकनाथ शिंदेंनी केला.