सावंतवाडी : वैभववाडी तालुक्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आज करूळ घाटात दरड कोसळली आहे.
या पावसामुळे सर्वाधिक परिणाम भुईबावडा आणि करूळ घाटांवर झाला आहे, जिथे दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतूक मंदावली आहे.भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने ही दरड बाजूला केली, ज्यामुळे वाहतूक पूर्ववत होण्यास मदत झाली.
दरम्यान, नव्याने बांधण्यात आलेल्या वैभववाडी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटातही ठिकठिकाणी किरकोळ प्रमाणात दगड पडण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, संबंधित ठेकेदाराने दरडी हटवण्यासाठी जेसीबी आणि कामगारांची टीम सज्ज ठेवली असल्याने वाहतुकीवर कोणताही मोठा परिणाम झालेला नाही.
गुरुवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने तर अक्षरशः झोडपून काढले, ज्यामुळे जनजीवन अधिकच विस्कळीत झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, विशेषतः घाटमार्गातून प्रवास करताना काळजी घेण्याचे सूचित केले आहे.