Varsha Gaikwad लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ३० खासदार निवडून आले. यामुळे महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक आम्हीच जिंकणार असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त होतो आहे. काही दिवसांपूर्वी मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. मात्र आता त्या चर्चा शमल्या आहेत. त्यानंतर आता काँग्रेसच्या महिला खासदाराने सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात असं म्हटलं आहे.

वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

“गणपती बाप्पा मोरयाचा गजर जगभरात घुमतो. मंगलमय वातावरण बघायला मिळतं. आम्ही बाप्पाच्या चरणी हेच साकडं घालत आहोत की बाप्पाला माहीत आहे की राज्याचं राजकारण हे पुरोगामी आणि प्रगत राजकारण आहे. या राजकारणाला गलिच्छ किनार लागली आहे. हे राजकारण स्वच्छ करण्याचं काम आम्हाला करायला मिळो इतकंच आमचं बाप्पाकडे मागणं आहे. येणाऱ्या विधानसभेत मला पूर्ण अपेक्षा आहे की सत्ता येईल. पैसे, गद्दारीच्या जिवावार आम्ही येऊ असं काहींना वाटतं आहे. पण तसं ते होणार नाही. लोकप्रतिनिधींबाबत लोकांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. सुसंस्कृत राजकारण बघायचं असेल तर महाराष्ट्राकडे बघा असं उदाहारण दिलं जायचं मात्र प्रत्यक्षात आत्ताचं राजकारण गलिच्छ झालं आहे.” असं वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या. न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं.

हे पण वाचा- Baramati: नोकरीसाठी जाहिरात का काढत नाही? मेडिकल कॉलेजच्या अधिकाऱ्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या

भाजपाला वर्षा गायकवाड यांचा टोला

“महाराष्ट्रात दोन पक्ष फोडण्यात आले. ईडी, सीबीआयचा गैरवापर केला गेला. त्याच माध्यमातून आमदारांना तिकडे नेलं. हसन मुश्रीफ, रविंद्र वायकर, अजित पवार, प्रफुल्ल पटेल तिकडे गेल्यानंतर त्यांचे क्लोजर रिपोर्ट कसे काय गेले? यामिनी जाधवांपासून सगळ्यांना क्लीन चिट कशी मिळाली? विरोधकांवर आरोप करायचे, त्यांना तुरुंगात टाकायचं आणि पक्षात आले तर त्यांना पवित्र करायचं असं राजकारण नसतं. राजकारण वैचारिक असलं पाहिजे. आम्ही राजकारणाची सुरुवात केली तेव्हा विचारधारा घेऊन आलो, पण विचारधारा सोडायची नसते.” असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. तसंच रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे यांच्याबाबत वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरेंबाबत काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?

“महिला मुख्यमंत्री झाली तर मला आनंदच होईल. ५० टक्के आरक्षण देण्यात आपण पहिलं राज्य होतो. महिला मुख्यमंत्री झाली तर आनंद होईलच. सगळ्या पक्षांकडे चेहरे आहेतच. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळेंचा चेहरा आहे, शिवसेना उबाठामध्ये रश्मी ठाकरे आहेत. तर काँग्रेसमध्येही चेहरे आहेत. महिला मुख्यमंत्री कुठल्याही महाविकास आघाडीपैकी कुठल्याही पक्षाची झाली तरीही मला आनंदच होईल. महिलांना खूप संघर्ष करावा लागतो, तरीही महिला राजकारणात येतात. आमच्यासमोर इंदिरा गांधींचा आदर्श आहे. सोनिया गांधींना आम्ही काम करताना पाहिलं आहे. भाजपात बघा, महिलांना मंत्रिपदही दिलं जात नाही, पक्षाचं अध्यक्षपद दिलं जात नाही”असं वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या आहेत. मविआची सत्ता आल्यास महिला मुख्यमंंत्री होऊ शकते का? असा प्रश्न वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.